

ओरोस : भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या चार पाच दिवसात युद्धपातळीवर आखलेल्या रणनितीमुळे भाजपची बिनविरोध एक्सप्रेस अखेर सुसाट निघाली असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे 7 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे 16 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा एक सदस्य असे मिळून 2 उमेदवार शिवसेनेचे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि ठाकरे शिवसेना बॅकफुटवर गेली असून आता उरलेल्या 100 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
सर्वात जास्त बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आहे. या विधानसभा मतदारसंघामधील देवगड तालुक्यात भाजपचे सर्वात जास्त 4 जिल्हा परिषद उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पडेल जि.प. गटाच्या सुयोगी रवींद्र घाडी या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून बापर्डे जि.प. गटातील भाजपच्या अवनी अमोल तेली याही बिनविरोध विजयी झाल्या आहेत. पोंभुर्ले जि.प. गटातील अनुराधा महेश नारकर आणि किंजवडे जि. प. गटातील सावी लोके या भाजपच्या दोन्ही उमेदवार विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
वैभववाडी तालुक्यातील कोळपे जि.प. गटातील प्रमोद रावराणे हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होतीच, त्यांच्या विरोधातील उमेदवारांनी मंगळवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते बिनविरोध निवडून आले. कणकवली तालुक्यातील खारेपाटण गटातील भाजपच्या उमेदवार प्राची इस्वलकर आणि जानवली येथील शिवसेनेच्या उमेदवार रूहीता तांबे यादेखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र कणकवली विधानसभा मतदारसंघ वगळता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जि.प.ची एकच जागा बिनविरोध निवडून आली आहे. भाजपचे उमेदवार प्रमोद कामत हे बांदा जि.प. गटातून बिनविरोध विजयी झाले आहेत.
भाजपची ही बिनविरोध एक्स्प्रेस पंचायत समिती निवडणुकीतही सुसाट निघाली आहे. कणकवली तालुक्यातील वरवडे पं.स. गणातील भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे आणि बिडवाडी पं.स. गणातील भाजपच्या संजना राणे या यापूर्वीच बिविरोध विजयी झाल्या होत्या. शुक्रवारी कणकवली तालुक्यातील भाजपचे आणखी तीन पं.स. उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये नांदगावमधील हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांनी यापूर्वीही पंचायत समिती सदस्य आणि नांदगावच्या सरपंचपदी काम केले आहे. हरकुळबुद्रुक पं.स. गणातून भापजच्या दिव्या पेडणेकर विजयी झाल्या असून नाटळ पं.स. गणातून भाजपच्याच सायली कृपाळ बिनविरोध निवडून आल्या आहेत. दिव्या पेडणेकर यांनी यापूर्वी कणकवली तालुक्याच्या उपसभापतीपदी काम केले आहे.
वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे पं.स. गणातील साधना सुधीर नकाशे, वेंगुर्ले तालुक्यातील आसोली पं.स. गणातील संकेत धुरी आणि मालवण तालुक्यातील आडवली-मालडी पं.स. गणातील सीमा सतीश परूळेकर हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले पं.स. गणातील भाजपचे महेश धुरी आणि दोडामार्ग तालुक्यातील कोलझर पं.स.गणाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार गणेशप्रसाद गवस हे बिनविरोध झाले आहेत. देवगड तालुक्यातील पडेल पं.स.गणामध्ये अंकुश ठुकरूल, नाडण पं.स.गणातील गणेश राणे, बापर्डे पं.स. गणातील संजना लाड, फणसगाव पं.स.गणातील समृध्दी चव्हाण, शिरगाव पं.स.गणातील शितल तावडे आणि कोटकामते पं.स. गणातील ऋतुजा खाजनवाडकर हे भाजपचे सहा उमेदवार पं.स.सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. शनिवारी 24 तारखेपर्यंत काही अर्ज मागे घेतल्यामुळे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. रविवार आणि सोमवार प्रजासत्ताक दिन असल्यामुळे दोन दिवस सुट्टी होती. या दोन दिवसात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे नेते पालकमंत्री नितेश राणे युध्दपातळीवर प्रयत्न करत होते. या दोन दिवसात राबविलेल्या मोहिमेमध्ये पालकमंत्र्यांना बऱ्यापैकी यश आले. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात 14 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. या मोहिमेमुळे महाविकास आघाडी आणि ठाकरे शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. ठाकरे शिवसेनेच्या अनेक उेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून प्रयत्न
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून महायुतीला लढत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी यापूर्वी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. या दोन तालुक्यात त्यांनी आपले संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत कुडाळ तालुक्यात मात्र महायुतीची एकही जागा बिनविरोध निवडून आली नाही. मालवणमध्ये मात्र भाजपचा एक पं.स. सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.
मनिष दळवी हे रिंगणातून बाहेर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या आदेश स्वीकारले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्या सह आप्पा गावडे, विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान या ठिकाणी आता समिधा नाईक, उबाठाचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.