मृत सिराजोद्दीन शेख बद्रोद्दीन pudhari photo
नांदेड

Nanded Crime : नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर तरुणाचा खून; दाेन जण गजाआड

जुन्‍या वादातून हत्‍या झाल्‍याची प्राथमिक माहिती; ​वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहर व परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, मध्यवर्ती बसस्थानकासमोर रविवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाचा खंजीरने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून, वजिराबाद पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या चार तासांत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

शेख सिराजोद्दीन शेख बद्रोद्दीन (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सिराजोद्दीन, सय्यद एजाज सय्यद बाबर (वय ३२) आणि त्यांचा एक मित्र रात्री जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हे दोघे बसस्थानक परिसरात आले असता श्री लॉजसमोर पुन्हा त्यांच्यात जोरदार भांडण जुंपले. या वादात सय्यद एजाज याने स्वतःजवळील खंजीर काढून साथीदाराच्या मदतीने सिरांजोद्दीनवर सपासप वार केले.

या हल्ल्यात सिराजोद्दीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

​या प्रकरणी शेख अझरोद्दीन यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात सय्यद एजाज आणि नितेश अग्रवाल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अवघ्या चार तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार करत आहेत.

वजिराबाद पोलिसांची पथकाची कामगिरी

​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून आणि पोलीस उप अधीक्षक (नांदेड शहर) रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.​तपास पथक: पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे, खंडु दर्शने. अंमलदार अरुण साखरे, विलास कदम, ज्वालासिंघ बावरी, संतोष पोकळे, संतोष पावडे, भाऊसाहेब राठोड, इम्रान पठाण, शरद सोनटक्के, विजयकुमार नंदे, येमेकर, भगवान गिते, किशोर जयस्वाल आणि बालाजी सातपुते आदींनी ही कारवाई केली.

फरार सहआरोपीला चार तासांत बेड्या

घटनेनंतर पसार झालेला दुसरा आरोपी नितेश गोपालदास अग्रवाल (वय ५१, रा. शिवशक्ती नगर रोड, नांदेड) याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने नितेश अग्रवाल याच्या मुसक्या आवळल्या.​याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ०४१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १०३(१), ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ४, २५, २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT