Biloli sand transport truck accident  Pudhari
नांदेड

Nanded Accident | रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने पादचाऱ्यास चिरडले; जागीच मृत्यू

सगरोळीतील भीषण अपघाताने परिसर हादरला; नागरिकांमध्ये संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

Biloli sand transport truck accident

बिलोली : तालुक्यातील सगरोळी येथील अनुसया नगर परिसरात रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने एका पादचाऱ्यास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात विठ्ठल गोविंद लवटे यांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एमएच २० जीसी ०७९३ क्रमांकाचा हायवा ट्रक रेती भरून देगलूरकडे जात होता. त्याचवेळी अनुसया नगर परिसरात विठ्ठल लवटे हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील हायवाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, लवटे यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, परिसरात दिवस-रात्र सुरू असलेल्या रेती वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असून काही वाहनांवर नंबर प्लेटदेखील नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिक आणि मृताच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फिरते पथक नेमावे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सगरोळीवासीयांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT