

Woman who snatched blind woman's Mangalsutra nabbed within just two hours
नवीन नांदेड : शहरातील सिडको भागात राहणाऱ्या अंध महिलेने घरासमोर केस विंचरत असताना गळ्यातील मंगळसुत्र खाली काढून ठेवले होते. फिर्यादी व तिचे पती दोघे अंध आहेत. याचा फायदा घेत एका महिलेने ते मंगळसूत्र पळवले. सिडको पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत संशयित महिलेची चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्या महिलेने मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या तत्परतेमुळे सदरील महिलेला तिचे मंगळसूत्र मिळाले.
कावेरी विकास मोरे (वय 25) वर्ष व्यवसाय घरकाम रा. अंबोली ता. नायगाव जि. नांदेड ह.मु सिडको नांदेड असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी व तिचे पती दोघे अंध असुन फिर्यादी ह्या घरासमोर केस विंचरत असताना गळ्यातील मंगळसुत्र खाली काढून ठेवले होते. पंरतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढुन ठेवलेले दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र फिर्यादी व फिर्यादीचे पती असे दोघेही अंध असल्याचा फायदा घेवून चोरुन नेले होते.
त्यावरुन फिर्यादी ह्या दिनांक 15/05/2026 रोजी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर तात्काळ तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा तात्काळ शोध घेत, गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून, वर नमुद महिला संशयित आरोपीस अवघ्या दोन तासात ताब्यात घेवून, तिच्याकडे कसून चौकशी केली असता तीने गुन्हा केल्याचे कबुल केले. अंध दाम्पत्यांचे चोरलेले दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. सदरील मंगळसूत्र २ ग्रॅमचे असून त्याची किंमत २० हजार रुपये आहे.
सदर आरोपी महिलेकडून जप्त करण्यात आलेले सोने कायदेशीर प्रक्रीया करुन तात्काळ फिर्यादी महिला यांना परत करण्यात आले व सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास करुन सदर संशयित आरोपी महिलेविरुध्द 12 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदरील कामगिरी ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर मटवाड पोलीस उप निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक रामकिशन मोरे यांनी केली.