Nanded BEd CET exam  pudhari photo
नांदेड

Nanded BEd CET exam : नांदेडमध्ये बी.एड.सीईटी परीक्षेत प्रचंड गोंधळ; शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!

संतप्त विद्यार्थ्यांनी केला ‌‘रास्ता रोको‌’

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः अपूर्ण बैठक व्यवस्था व कुठलीच सुविधा नसताना गुलजार एज्युकेशन सोसायटी संचलित मराठवाडा ऑनलाइन एक्झाम सेंटर या परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिल्यामुळे शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परीक्षा सुरू होताच इंटरनेट सुविधा विस्कळीत झाली. परिणामी शेकडो विद्यार्थी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत नांदेड-हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको केला. या गंभीर प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांना बी.एड.सीइटी परीक्षेला मुकावे लागले.

शुक्रवारी नांदेड येथे बी.एड. सीइटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बोंढार परिसरातील गुलजार एज्युकेशन सोसायटी संचलित मराठवाडा ऑनलाइन परीक्षा केंद्रावर 200 ते 250 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असताना येथे सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी केंद्रावर मोठी गर्दी केली होती.

दोन सत्रांत ही परीक्षा होणार असल्याने सकाळच्या सत्राची परीक्षा सुरु होताच विद्यार्थ्यांना अपुऱ्या बैठक व्यवस्थेचा सामना करावा लागला. परीक्षेसाठी पुरेसे संगणक संचही नव्हते. परीक्षेदरम्यान इंटरनेट सुविधा अचानक विस्कळीत झाल्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले विद्यार्थी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करीत परीक्षा केंद्राबाहेर पडले. सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून ही परीक्षा तत्काळ घेण्याची मागणी विद्यार्थी करीत होते.

परीक्षा केंद्रावरील वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्रावरील प्रशासनाला जाब न विचारताच विद्यार्थ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळाले. मराठवाड्यासह अन्य विभागातून शेकडो विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झाले होते; परंतु केंद्रावरील असुविधांमुळे त्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

विशेष म्हणजे गतवर्षीही याच केंद्रावर बी.एड.सीइटी परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला होता, अशी माहिती समोर आली आहे; परंतु यावर्षी या गोंधळाने परिसीमा गाठली असून विद्यार्थ्यांनी सोबत आणलेले साहित्य लॉकरमध्ये ठेवण्यासाठीही केंद्रचालकांनी पैसे वसूल केल्याचा आरोपही परीक्षार्थ्यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

ऑनलाइन परीक्षा केंद्रावरील गोंधळाची बाब समजताच नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ दखल घेत घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवले. संतप्त विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थी शांत झाल्याचे सांगण्यात आले..

  • परीक्षा केंद्रावरील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बी.एड. सीइटी परीक्षेची अपूर्ण बैठक व्यवस्था, संगणक संच नसताना हे परीक्षा केंद्र का देण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे. वर्षानुवर्षे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे, याला सर्वस्वी जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT