नांदेड आकाशवाणीला छत्रपती संभाजीनगर नावाचे वावडे ! file photo
नांदेड

नांदेड आकाशवाणीला छत्रपती संभाजीनगर नावाचे वावडे !

प्रसारण कामकाजात औरंगाबाद हेच नाव

पुढारी वृत्तसेवा

Nanded All India Radio has an aversion to the name Chhatrapati Sambhajinagar

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण होऊन अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाही नांदेड आकाशवाणीच्या रूपरेषेमध्ये (क्यू सिटवर) अजूनही औरंगाबाद हेच नाव कायम असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेड आकाशव-ाणीला छत्रपती संभाजीनगर या नावाचे वावडे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे ठेवावे, ही गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी राज्य सरकारने मान्य करून १५ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आल्याचे राज्य शासनाच्या राजपत्र अधि सूचनेद्वारे घोषित करण्यात आले. या नामकरणाला फेब्रुवारी २०२५ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने ना हरकत पत्र देऊन राज्य शासनाच्या या नामकरण निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.

केंद्र सरकारच्या या अधिकृत मंजुरीनंतर आकाशवाणी केंद्र नांदेडसह इतर सरकारी माध्यमांना हा निर्णय लागू झाला आहे. १५ ऑक्टोबर २०२५ मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत मंजुरीनंतर औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर (सीपीए सएन) असे ठेवण्यात आले.

राज्य व केंद्र शासनाच्या राजपत्र सूचनेनुसार नांदेड आकाशवाणी मध्येही कार्यालयीन व प्रसारण कार्यक्रमात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करणे कायदेशीर रीत्या बंधनकारक असताना येथील केंद्रात दैनंदिन क्यू सेट अर्थात रूपरेषा मध्ये अद्यापही औरंगाबाद याच नावाचा उल्लेख आढळून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक असली तरी येथील कार्यरत कार्यक्रमाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

छत्रपती संभाजीनगर असे नामकरण होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरीही आकाशवाणी मध्ये औरंगाबाद हेच नाव सुरू असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

आकाशवाणीमध्ये भीमराव शेळके सेवानिवृत्त झाल्यानंतर कार्यक्रमाधिकारी म्हणून विश्वास वाघमारे यांनी चांगल्या पद्धतीने पदभार सांभाळा होता परंतु त्यानंतर राहुल आत्राम यांच्याकडे ही सूत्रे आल्यानंतर कार्यक्रमांचा दर्जा प्रचंड घसरल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकप्रिय असलेल्या लोकसंगीत या कार्यक्रमात गेल्या अनेक महिन्यापासून कुठलीही नवीन निर्मिती दिसत नाही. पूर्वी झालेलेच कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचे प्रकार वारंवार घडतात. याशिवाय आपल्याच मर्जीतल्या लोकांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेणे आकाशवाणीवर त्यांचे साहित्य प्रसारित करणे यापलीकडे कुठलेच नाविन्यपूर्ण कार्यक्रम होत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT