Nanded agriculture news | हरभऱ्यावर घाटेअळीचा वाढता प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची भीती

किनवट तालुक्यात हरभऱ्याचा 9 हजार 777 हेक्टर पेरा
Nanded agriculture news
Nanded agriculture news
Published on
Updated on

किनवट : किनवट तालुक्यातील हरभऱ्याचे पीक सध्या फुलोरा व घाटे लागण्याच्या अवस्थेत असून, बहुतांश भागात घाटेअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र 13 हजार 456 हेक्टर असले तरी प्रत्यक्षात 9 हजार 777 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप हंगामातील नुकसानीनंतर रब्बीतील पिकांवर आलेल्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. घाटेअळी ही हरभऱ्याच्या फुलोरा व घाटे अवस्थेत अधिक नुकसानकारक ठरते. अळी पानांवरील हरितद्रव्य खाऊन पाने वाळवते, तर पुढील अवस्थेत फुले व घाटे पोखरून आतील दाणे खाते. एक अळी साधारणतः 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करू शकते.

घाटेअळीच्या नियंत्रणासाठी अवाजवी कीटकनाशकांचा वापर टाळण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पक्षी हे या किडीचे नैसर्गिक शत्रू असल्याने शेतात पक्षी थांबे उभारावेत तसेच कामगंध सापळ्यांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.

पहिली फवारणी 50 टक्के फुलोऱ्यावर असताना निंबोळी अर्क पाच टक्के किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट पाच टक्के एस.जी. चार ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा फ्ल्युइँडामाईड 20 टक्के डब्ल्युजी तीन मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिपोल 18.5 टक्के एस.सी. 3.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तसेच तांबेरा रोगाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के ई.सी. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, तालुक्यातील जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने हरभऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतात शिरून पीक नष्ट करीत असल्याने वन विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news