Nanded News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रशासन गतिमान File Photo
नांदेड

Nanded News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रशासन गतिमान

जि.प.गट-गणांच्या रचनेबाबत कमालीची उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

Nanded Administration in motion for local body elections

नांदेड, पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेने प्रभाग रचना समिती स्थापन केली तर जिल्हा परिषदेने गट व पंचायत समिती गणांच्या रचनेची तयारी केली आहे. नगर पालिका व नगर पंचायत स्तरावर सुद्धा तयारी सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी शुक्रवारी (दि. १३) या संदर्भात एक बैठक घेऊन सर्व संबंधितांना सूचना दिल्या, नदिड जिल्ह्यात नदिड महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती त्याच बरोबर १२ नगर परिषदा व हिमायतनगर नगर पंचायत असा निवडणुकांचा व्यापक कार्यक्रम आहे.

महापालिका प्रभाग रचनेसाठी समिती कार्यान्वित राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.'ड' दर्जा असलेल्या नांदेड महापालिकेच्या प्रभाग रचना समितीत विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीवर आयुक्तांचे नियंत्रण असून अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या नेतृत्वाखाली समिती सक्रिय झाली आहे. प्रारूप प्रभाग रचना करून दावे व हरकती मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन दि. १ सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाने दिलेल्या आदे शानुसार बहुसदस्य प्रभाग पद्धती राहणार असून प्रत्येक प्रभागात चार सदस्य असतील, जास्तीत जास्त ५ तर कमीत कमी तीन सदस्य ठेवण्याची मर्यादा आहे. मनपा हद्दीतील नागरी क्षेत्राची प्रभागामध्ये विभागणी करणे, प्रगणक गटाची मांडणी, प्रभागांची संख्या, सरासरी लोकसंख्या व हद निश्चित करणे, एका इमारतीतील मतदार वेगवेगळ्या प्रभागात न विभागता प्रभाग रचना करणे, आदी काही मार्गदर्शक सूचनांनुसार समिती कार्य करेल.

नांदेड महापालिका हद्दीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे साडे सहा लाख होती. आता मागील १४ वर्षात त्यात नवयुवक व स्थलांतरित मतदार लक्षात घेता सुमारे तीन ते साडे तीन लाख मतदारांची भर पडली असे गृहित धरल्यास ५५ टक्केच्या हिशोबाने सुमारे ५ लाख मतदार होतात. कोणत्या दिनांकाची मतदार यादी ग्राह्य धरली जाते, त्यानुसार एकूण मतदार संख्या व प्रभागनिहाय मतदार संख्या स्पष्ट होईल.

दरम्यान, राजकीय स्तरावर केव्हाच नगारे वाजायला सुरवात झाली असून लग्नसराईमध्ये इच्छुकांचे चेहरेही समोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष तसेच नेते मंडळी कामाला लागली असून खासदार व आमदार आपल्या मतदार संघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येते.

नांदेड सुमारे तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना हक्काचे कारभारी नाहीत; परंतु आता ते निवडण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या व या सर्व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६५ गट असून १६ पंचायत समित्यांमध्ये १३० गण आहेत. मुखेड, हदगाव, किनवट हे मोठे तालुके असून अर्धापूर, हिमायनगर, मुदखेड हे छोटे तालुके आहेत. सर्वाधिक व कमीत कमी गट व गण वरील तालुक्यात असतील.

महागनरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांप्रमाणे राज्यातील नागरी स्तरावरील निवडणुकाही रखडल्या होत्या. तिथेही लगबग सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात १२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायती असल्या तरी नायगाव, अर्धापूर व माहूर या नगर पंचायतींची मुदत अद्याप संपली नाही. तिथे लोकनियुक्त समित्या कार्यरत आहेत; परंतु फक्त हिमायतनगरची मुदत संपली आहे. त्याच बरोबर १२ नगर पालिकांची मुदत देखील संपली आहे.

या सर्व ठिकाणी निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. २०१४ मध्ये युतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष सर्वसामान्य जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता, आताही हे पद जनतेतून निवडले जाणार आहे. महापालिकेप्रमाणेच नगर पालिका व नगर पंचायत निवडुकांसाठी अगोदर प्रभाग रचना करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT