

Agricultural damage due to Nanded rains
विशेष प्रतिनिधी
नांदेड : मृगाच्या पहिल्याच पावसाच्या तडाख्यात 'चिकाळा' (ता. मुदखेड) येथील तरुण शेतकऱ्याच्या शेवग्याची शेती जमीनदोस्त झाली आहे. आ. श्रीजया चव्हाण यांचा ताफा तालुक्यात येऊनही 'चिकाळ्या'कडे वळला नाही. त्यामुळे शेवग्याच्या शेतीसोबत स्वप्नही जमीनदोस्त झालेल्या अनिल देशमुख या तरुण शेतकऱ्याने, देवा भाऊ, आमच्यावर आभाळ कोसळलं असून, मायबाप सरकार आता बांधावरही यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट कोण पाहणार? असा सवाल उद्विग्नतेतून केला आहे.
चिकाळा येथील गोविंदराव दत्तराव देशमुख या शेतकऱ्याचा मुलगा नव्याने शेतीकडे वळला आहे. मुदखेड-चिकाळा मुख्य रस्त्यालगत असलेल्या ८० गुंठे जमिनीत 'शेवगा' पिकाची लागवड करून उदरनिर्वाहाची नवी स्वप्ने पाहत होता. परंतु दि.९ जून रोजीच्या सायंकाळच्या पावसासोबत आलेल्या रौद्ररुपी वादळाने त्याची शेवग्याची शेती काही मिनिटांत जमीनदोस्त केली.
हातातोंडाशी आलेला शेवगा भुईसपाट झाला. लागवडीचा दीड लक्ष खर्चही मृगाच्या पावसात वाहून गेला. आता शेतात मृतावस्थेत आडवी पडली आहेत ती केवळ शेवग्याची झाडे. ती बाहेर काढण्यासाठीही वेगळा खर्च लागणार आहे; परंतु तो खर्चही शेतकऱ्यास परवडणारा नाही. आ. श्रीजया चव्हाण तालुक्यात येऊनही गेल्या; परंतु त्यांचे पाऊल बांधावर पडले नाही.
उद्ध्वस्त झालेल्या शेवग्याच्या बांधावर तहसीलदार येऊन गेले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे शनिवारी दुपारनंतर हिंगोलीहून थेट अर्धापूर तालुक्यात केळीच्या बागांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत; पण त्यांच्या या दौऱ्यात मुदखेड तालुक्याची भेट नियोजित नाही. ते अर्धापूरहून नांदेडला येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.