नायगाव : प्रतिनिधी
नायगाव-उमरी मार्गावरील सुरू असलेल्या रस्ता व नाली बांधकामाच्या कामाबाबत आता नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या संपूर्ण कामाच्या दर्जा व नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरात “मोठा आणि रुंद रस्ता होणार” असा गाजावाजा करीत नगर पंचायतमार्फत नागरिकांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. तब्बल १८ मीटर रस्त्याचे स्वप्न दाखवत अनेक दुकानदार व नागरिकांवर दबाव आणण्यात आला; मात्र यात कुठे माशी शिंकली कोण जाणे प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामामध्ये वेगळीच परिस्थिती दिसून येत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. (Naigaon Kuntur Umri road construction)
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी सुरुवातीला करण्यात आलेली मार्किंग आणि प्रत्यक्ष सुरू असलेले बांधकाम यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. काही भागात रस्त्याची रुंदी कमी-जास्त होत असून, नालीचे बांधकामही सरळ रेषेत न करता मनमानी पद्धतीने वेडे-वाकडे करण्यात येत असल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाणी साचणे, रस्त्याचे नुकसान होणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी नागरिकांनी दाखवून दिलेल्या मूळ मोजमापांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने स्वतःच्या सोयीने काम सुरू ठेवल्याचा आरोप होत आहे. “मार्किंग एक आणि प्रत्यक्ष काम दुसरे” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना कामात एकसंधता आणि तांत्रिक अचूकता का दिसून येत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा उघडे खड्डे, वेड्या वाकड्या मनमानी अर्धवट नाल्या आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी नव्याने टाकलेले बांधकाम अल्पावधीतच तडे गेल्याचेही नागरिक सांगत आहेत.
संबंधित विभागाने शहर विकासाच्या नावाखाली नागरिकांवर अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला; मात्र आता प्रत्यक्ष कामात पारदर्शकता, दर्जा आणि नियोजन कुठेच दिसत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून मूळ आराखडा सार्वजनिक करावा, तसेच कामाची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.