Naigaon Illegal Sand Stock
नायगाव : नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव गौरी येथे जुन्या गावातील मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात मुरूमाचा, तर काही अंतरावर काळ्या रेतीचा कथित साठा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक दिवसांपासून हा साठा उघड्यावर असल्याचे सांगितले जात असून, संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्य नागरिकांनी घरबांधणीसाठी अल्प प्रमाणात मुरूम किंवा रेती आणली तरी महसूल विभागाकडून तातडीने कारवाई केली जाते. मात्र, मोठ्या प्रमाणातील कथित साठ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या कथित साठवणुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, संबंधित ठिकाणाची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, आवश्यक असल्यास साठा जप्त करावा तसेच उत्खनन, वाहतूक व साठवणुकीस जबाबदार आढळणाऱ्यांवर महसूल व इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करत महसूल यंत्रणेच्या देखरेखीवरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कथित अनधिकृत उत्खनन व साठवणुकीचे प्रकार होत असल्याची चर्चा असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर महसुली व कायदेशीर कारवाई करावी, तसेच जप्त करण्यात येणारा मुरूम व रेती शासनाच्या नियमानुसार घरकुल योजना, सार्वजनिक विकासकामे आणि इतर शासकीय कामांसाठी वापरण्यात यावा, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात महसूल प्रशासन कोणती भूमिका घेते, चौकशीचे आदेश दिले जातात का आणि त्यानंतर काय कारवाई होते, याकडे नायगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नायगाव तालुक्यात परवानगीच्या अटी व मर्यादांचे उल्लंघन करून काही ठिकाणी कथित मुरूम उत्खनन सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. परवानगी एका मर्यादित क्षेत्रासाठी असताना इतर ठिकाणांहूनही मुरूम उपसा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मुरूम वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत असून, या प्रकारावर महसूल यंत्रणेने प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.
तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात असतानाही अशा प्रकारांच्या चर्चेमुळे प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी तसेच नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.