

सारखणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत सिंदखेड पोलिसांनी आणखी एक प्रभावी कारवाई करत परवान्याविना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १८ जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व त्यांचे पथक अवैध धंद्यांविरोधातील कारवाईसाठी गस्तीवर असताना सिंदखेडहून लोकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील मनीरामथड धरणाखालच्या नाल्यातून संशयास्पदरीत्या येणारा ट्रॅक्टर दिसून आला.
ट्रॅक्टर (क्र. एमएच २९ बीसी ६३८१) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रास अवैध रेती आढळून आली. चालक प्रमोद दत्ता मुरके (वय ३८, रा. सिंदखेड, ता. माहूर) याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत महिंद्रा ५८५ डीआय ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियमाच्या कलम ४ व २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कोंडापलकुलवार करीत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस कर्मचारी रविकांत कांबळे, संजय शेंडे, अंकुश इंगळे व स्वप्निल नरवाडे यांनी पार पाडली.