अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून अत्याचार; दोन आरोपींना नाशिकमधून अटक pudhari photo
नांदेड

Nanded Crime : अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून अत्याचार; दोन आरोपींना नाशिकमधून अटक

उस्माननगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः लोहा तालुक्यातील उस्माननगर येथील शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना जेरबंद करण्यात उस्माननगर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपींना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून ताब्यात घेतले. अत्याचार उघड झाल्याने या गुन्ह्यात आता पोक्सो कायद्याची कलमे वाढवण्यात आली असून, पोलिसांच्या या तत्परतेबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेोहा तालुक्यातील उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही अल्पवयीन बालिका 1 जानेवारी रोजी शाळेत गेली असता अचानक बेपत्ता झाली होती. याप्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात 14 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासा दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित बालिका गोवा राज्यात आहे. पोलिसांचे एक पथक तातडीने गोव्याला रवाना झाले, मात्र आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच तेथून पळ काढला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी शिवाजी रामकिशन बीचेवाड (वय 20 वर्षे, रा. लोहा, जि. नांदेड) , आकाश आनंद बीचेवाड (वय 19 वर्षे, रा. वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड) यांना मालेगाव एमआयडीसी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे असल्याची खात्री पटली.

पोलिसांनी तिथे सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तपासात बालिकेवर शारीरिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी मूळ गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत वाढीव कलमे लावली आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही यशस्वी मोहीम पोलिस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता सहायक पोलिस निरीक्षक संजय नीलपत्रेवार , पोलिस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, वसंत तिडके, साईनाथ मोरे, प्रकाश पेद्देवाड व दीपक ओढणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. पथकाच्या या कामगिरी बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उस्माननगर पोलिसांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT