

अकोला : अकोट शहरातील राजेंद्र नगर भागात जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लखन अंभोरे या युवकाचा १० मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकोट पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवत ६ मुख्य आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खानापूर वेस जवळील राजेंद्र नगर भागात ही घटना घडली. फिर्यादी सौ. दुर्गा लखन अंभोरे यांनी दिलेल्या जबानीनुसार, मोहल्ल्यातच राहणारा आरोपी राम पांडुरंग अंभोरे आणि त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर टोळी जमवून लखन अंभोरे यांच्यावर हल्ला केला. जुन्या वैमनस्यातून आरोपींनी लोखंडी पाईप, चाकू, दगड आणि विटांनी लखन यांना बेदम मारहाण केली होती.
या भीषण हल्ल्यात लखन अंभोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने १० मार्च रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील आणि अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. एकूण ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना अधिक तपासासाठी ६ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट शहर पोलीस करत असून, या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.