नांदेड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगत गौप्यस्फोट केला आहे. तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच तेव्हा जर आमदारांची संख्या कमी पडली असती तर माझीही आमदारकी रद्द झाली असती, असे ते म्हणाले.
जेव्हा आम्ही बंडखोरी केली तेव्हा आम्ही गुवाहाटीला जाताना बालाजी कल्याणकरांनाही घेऊन गेलो होतो. ती कल्याणकरांची आमदारकीची पहिली वेळ होती. ते म्हणत होते की, माझी ही पहिली वेळ, प्रथमच आमदार झालो आणि हे आम्हाला घेऊन चाललेत. आमदारकी रद्द झाली तर हाती आलेली संधी गेली, असे म्हणत कल्याणकर तणावात राहायचे आणि जेवणही करायचे नाहीत, असे शिरसाट म्हणाले.
आम्ही त्यांना सांगायचो, काही तरी खा, त्यावर ते म्हणायचे नको. एकदा तर कल्याणकर म्हणाले की, मी आता हॉटेलवरून खाली उडीच मारतो. त्यावेळी आम्ही आमदरांची संख्या मोजत होतो, तर कल्याणकरांना खाली उडी मारायची पडली होती, असा किस्सा शिरसाटांनी सांगितला.
आता त्यांची चिंताच मिटली
प्रत्यक्षात आ. कल्याणकर आमच्यापेक्षा हुशार निघाले. कारण सर्वात जास्त निधी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आणला. एवढेच नव्हे तर ते दुसऱ्यांदा निवडूनही आले. आता त्यांना चिंताच राहिली नाही, असे शिरसाट यांनी नमूद केले.