MIDC to be built in Umrit on the site of Ginning
उमरी, पुढारी वृत्तसेवा: उमरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून उमरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बहुचर्चित जिनिंगच्या जागेवर एमआयडीसी उभारून उद्योगधंदे वाढवून एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश पवार यांनी शुक्रवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना आमदार राजेश पवार म्हणाले, उमरी नगर परिषदेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजपा सर्व ताकदीने उमेदवार उभे करणार असून सर्वच जागेवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जे सोबत आले त्यांना सोबत घेऊन मित्र पक्षांसोबत ही निवडणूक लढवू आणि जिंकू.
उमरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून आतापर्यंत शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार कामेही सुरू झाली आहेत. विकासाचा मुद्दाच डोळ्यासमोर आहे. उमरी शहरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारती सुसज्ज करणे, उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवणे, नवीन सभागृह बांधणे, शादीखाना उभारण `सह अनेक विकासात्मक कामे पूर्ण करण्यात येतील.
पत्रकार परिषदेला व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, सुभाष पेरेवार, डॉ. विक्रम देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, संजीव सवई, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सावंत, बालाजी माचेवार आदी उपस्थित होते.
पूनमताई पवार यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावोगावी भेट देऊन महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. उमरी नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल, यात शंका नाही. मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय देणार असून उमरी आणि धर्माबाद नगर परिषदेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वासही आमदार राजेश पवार यांनी व्यक्त करत पंचायत समिती व जिल्हा परिषद भाजपचीच असेल.