Human Leopard Conflict Solutions (Pudhari Photo)
नांदेड

Leopard Control | बिबटे रोखण्यासाठी उपाय! वनविभागाचा ‘बकरा प्रकल्प’ चर्चेत; भटक्या कुत्र्यांचा पर्याय?

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने वनविभाग प्रचंड दबावाखाली आहे

पुढारी वृत्तसेवा

Human Leopard Conflict Solutions

प्रशांत भागवत

उमरखेड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने वनविभाग प्रचंड दबावाखाली आहे. मानवावर होणारे हल्ले रोखण्यासाठी जंगलात कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने बकर्‍या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या उपक्रमावर वेगवेगळ्या स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे, मानवी वस्तीवरील दबाव कमी व्हावा, यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, राज्यात भटक्या कुत्र्यांची वाढही एक गंभीर समस्या बनली असून अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर, नागरिकांवर हल्ले करून जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत. कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेनंतरही अनेक शहरांत व ग्रामीण भागात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते.

याच पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांनी नवा मुद्दा मांडला आहे. जंगलात सोडल्या जाणाऱ्या बकर्‍यांपेक्षा भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलल्यास बिबट्यांच्या खाद्यसाखळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

भटके कुत्रे हे ग्रामीण भागातील बिबट्यांचे मुख्य आणि नैसर्गिक शिकार असल्याने या प्रजातींमधील नैसर्गिक समतोल राखण्याची संधी उपलब्ध होते. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आल्यास, मानवी वस्तीत त्यांचे हल्लेही कमी होतील; शिवाय बिबट्यांना जंगल परिसरात तुलनेने उपलब्ध आणि परिचित खाद्य मिळू शकते, अशी मांडणी तज्ज्ञांनी केली आहे.

दरम्यान, काही वनअधिकारी मात्र भटके कुत्रे थेट जंगलात सोडण्याचा किंवा त्यांच्यावर बिबट्यांची शिकार अवलंबून ठेवण्याचा प्रस्ताव धोकादायक असल्याचे मत व्यक्त करतात. कुत्र्यांमुळे वन्यजीवांना रोगांचा प्रसार होण्याचा धोका, परिसंस्थेवरील दुष्परिणाम आदी मुद्दे उपस्थित होत आहेत.

राज्यातील नागरिक, पर्यावरण अभ्यासक, पशुसंवर्धन अधिकारी आणि वनविभाग या सर्वांनी मिळून दीर्घकालीन, वैज्ञानिक आणि टिकाऊ उपाययोजना शोधण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. बिबट्या चा उपद्रव रोखणे, मानवाची सुरक्षा, भटके प्राणी नियंत्रण आणि वन परिसंस्थेचा समतोल या सर्वांचा विचार करणारी सर्वंकष नीती तयार होणे हीच काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT