नांदेड बसस्थानकावरील हाॅटेलला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान pudhari photo
नांदेड

Nanded Fire News : नांदेड बसस्थानकावरील हाॅटेलला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

नांदेड :येथील मुख्य बसस्थानक परिसरातील हाॅटेललला २९ जून रोजी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील साहित्यासह सुमारे ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील दुकाने बचावली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय बहादूर सिंग ठाकूर यांच्या मालकीच्या हाॅटेल मधून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमध्ये दुकानातील सिलिंग, फ्रिज, थर्मास, स्टीलची भांडी आणि गॅस सिलिंडर जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने तत्काळ धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान एका बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी होज रीलच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे उजव्या बाजूचे साईनाथ घोडके यांचे 'साई पूजा ऑप्टिकल' (अंदाजे १.५ लाखांचा माल) आणि डाव्या बाजूचे पवन राठोड यांचे 'नवनाथ रसवंती गृह' आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून सुखरूप वाचले. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT