Ashok Chavan : खा. अशोक चव्हाण चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी ! File Photo
नांदेड

Ashok Chavan : खा. अशोक चव्हाण चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी !

सुमारे दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या.

पुढारी वृत्तसेवा

Marathi schools of Zilla Parishad and private educational institutions started from Monday

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मुंबईतील नामांकित इंग्रजी शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण करणारे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी भोकर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर राहून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या आनंदात आपला सहभाग नोंदविल्याचे आगळे दृश्य बघायला मिळाले.

सुमारे दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि खासगी शिक्षण संस्थांच्या मराठी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. तत्पूर्वी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांनी पहिल्या दिवशी एका शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि भेटीचा मान भौकरच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला मिळाला.

नदिड शहरामध्ये वास्तव्यास असलेले चव्हाण सकाळीच भोकरला रवाना झाले. त्यांचे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आगमन झाल्यानंतर स्वागताचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. नंतर 'फेसबुक' च्या माध्यमातून या शाळा भेटीची नोंद करताना, आज माझ्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे तसेच विद्याध्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वतः अशोक चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थिदशेतील आठवणींची नोंद आतापर्यंत कोठेही केलेली नाही. पण त्यांच्या मातुश्री दिवंगत कुसुमताई चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या शैक्षणिक कारकीर्दीचा उल्लेख त्यांच्या 'कुसुमांजली' या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यानुसार अशोक यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एका इंग्रजी शाळेमध्ये झाले होते. या शाळेत विद्यार्थ्यांचे गट-विभाग निर्माण करून त्याला 'हाऊस' असे संबोधले जायचे. अशोक चव्हाण 'टिळक हाऊस' मध्ये होतेआणि या विभागाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते.

नेतृत्वाचा पहिला अनुभव अशोकला प्राथमिक शाळेतच मिळाला, असे कुसुमताईंनी वरील पुस्तकात नमूद केले होते. प्राथमिक शाळेतील टिळक हाऊसमधून सुरू झालेला चव्हाण यांचा नेतृत्व प्रवास पुढे त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनपर्यंत घेऊन गेला. २०१५ साली ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा लहानपणी त्यांनी शाळेतल्या टिळक हाऊसचे नेतृत्व केल्याची आठवण समोर आली होती, (काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेत राहूनही आता ते भाजपात आहेत.)

भोकरच्या शाळा भेटीत चव्हाण यांनी उपस्थित शिक्षक कर्मचारी विद्याध्यांसमोर छोटेखानी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवून तसेच विद्यार्थ्यांच्या आधु‌निक गरजा लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेने गुणवत्ता चांगली राखल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.

चव्हाण यांचे भोकर येथील जिल्ला परिषदेच्या शाळेत सकाळी आगमन झाल्यानंतर शाळेतल्या विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले. शाळेच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. सत्कारामध्ये त्यांना ग्रंथभेट देण्यात आली. त्यांच्या शाळा भेटीप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, तहसीलदार विनोद गुंडमवार, सुनील शहा, दिवाकर रेड्डी, प्रकाश देशमुख, विनोद चिंचाळकर, जगदीश पाटील भोसीकर, रामचंद्र मुसळे, मनोज गिमेकर प्रभुतीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी कदम यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी तर संजय वाघमारे यांनी आमार मानले.

अशोक चव्हाण यांच्या आधी दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भोकरमधील जिल्हा परिषद हायस्कूलची इमारत खूप जुनी आणि जीर्ण झाली असल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतानाच नांदेड जिल्ह्यातील सर्वात सुंदर शाळा इमारत म्हणून या इमारतीकडे भविष्यात पाहिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT