

Youth on bike killed in tractor collision
अर्धापूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात पेरणी करण्यासाठी पाठीमागे तिफणयंत्र जोडून रस्त्याने जात असलेल्या ट्रॅक्टरच्या हेडला पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका न तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१६) अर्धापूर-तामसा महामार्गावरील तपोवन बुध्दभुमी कमानीजवळ सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे.
चेनापूर येथील ट्रॅक्टर (एम.एच.-२६, बी.एक्स. ६२१८) हे पेरणीचे तिफन यंत्र जोडून ई लहान गावाकडून चेनापूरकडे येत होते. ट्रॅक्टर चेनापूर शिवारातील तपोवन बुध्दभुमीच्या कमानीजवळ येताच पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (एम.एच.-२६, एम.-२७१८) ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दिगंबर उर्फ पप्पू दिपक बेराडे (वय ४०, रा. चेनापूर, ता. अर्धापूर) हा युवक जागीच ठार झाला.
या घटनेचे वृत्त कळताच चेनापूर आणि लहान येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली. तर महामार्ग पोलीस व अर्धापूर पोलीस घटनास्थळी धावले आणि रितसर पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मयत पप्पू पाटील बेराडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सोमवारी त्याच्यावर चेनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.