

Barad-Mudkhed road work still incomplete
मुदखेड, पुढारी वृत्तसेवा :
वनविभागाची परवानगी तीन वर्षांनंतरही रखडलेलीच असल्याने बारड ते मुदखेड दरम्यान डोंगरगाव जवळ रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. संबधित सा.बां. विभागाने याकडे लक्ष घालून रस्त्याचे रखडलेले अर्धवट काम सुरु करावे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे.
बारड ते मुदखेड दरम्यान रस्त्याच्या कामासाठी वन विभागाची परवानगी रखडल्यामुळे डोंगरगाव जवळ खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर अवजड वाहने, ट्रक, केळीच्या गाड्या, अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रकांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था गंभीर झाली आहे. मुदखेड येथे रविवारी आठवडी व बैल बाजार तर बारड येथे शनिवारी आठवडी बाजार भरत असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्त्याचे जवळपास अर्धा किलोमीटर काम वनविभागाची व इतर परवानगी रखडल्यामुळे अर्धवट काम सोडून संबंधित कंत्राटदार लंपास झाला आहे.
खा. अशोक चव्हाण यांनी डोंगरगाव येथे विधानसभा निवडणुकीत एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले होते की, अॅड श्रीजया चव्हाण यांना भरघोस मतदान करा, त्या निवडून आल्यानंतर तात्काळ या रस्त्यासाठी सर्व प्रयत्न करून परवानगी केंद्र व राज्य सरकारकडून आणून रस्त्याचे रखडलेले अर्धवट काम तात्काळ सुरू करु, असे आश्वासन डोंगरगाव येथे ग्रामस्थांना दिले होते. परंतु, महायुतीचे सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले. परंतु, आ. श्रीजया चव्हाण अद्यापपर्यंत यरस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यायला तयान नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराज दिसून येत आहे.
खा. अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे बारड ते मुदखेड दरम्यानच्या रस्त्याचे काम मजबूत व चांगल्या प्रकारे दर्जेदार झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे केंद्र सरकार सरकारकडून वनविभागाची परवानगी या रस्त्यासाठी मिळत नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपाचे असल्यामुळे या सरकार रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.