Man who impersonated 'LCB' police officer and demanded money arrested
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : स्वतःला स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) पोलीस असल्याचे भासवून नागरिक व व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी करणाऱ्या एका तोतया पोलिसास नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने उमरी येथून ताब्यात घेतले आहे. या - कारवाईत आरोपीकडून १३ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्याला उमरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बालाजी पंडू कांबळे (वय २९, रा. शेल्लाळ, ता. उदगीर, जि. लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १८ नोव्हेंबर रोजी एलसीबीचे पथक धर्माबाद व बिलोली उपविभाग परिसरात गस्त घालत होते.
दरम्यान, उमरी येथील बसस्थानक रोडवर एक संशयित इसम थांबल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उमरीतील एका भाजीपाला व्यावसायिकास फोन करून 'मी एलसीबी नांदेड येथून पोलीस राहुल कांबळे बोलत आहे; भाजीपाला वाहतुकीचे वाहन पकडायचे नसेल तर भेटून पैसे द्या,' अशी धमकी देत पैशांची मागणी केल्याचे समोर आले. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो 'राहुल कांबळे' या बनावट नावाने अनेक नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडून १२ हजार रुपये किमतीचा 'रियलमी' कंपनीचा मोबाईल आणि १ हजार ६१० रुपये रोख, असा एकूण १३ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सहायक उपनिरीक्षक दारासिंग राठोड, अंमलदार मोहन हाक्के व ब्रह्मानंद लामतुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.