

MP Ravindra Chavan urges Deputy Chief Minister Sunetra Pawar to release water from the Manar project
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नायगाव, बिलोली आणि कंधार तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी बारूळ येथील मनार प्रकल्पातून दोन आवर्तन सोडण्याची मागणी खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
संबंधित तालुक्यांतील अनेक गावांमध्ये भूजल पातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
या परिस्थितीत बारूळ येथील मनार प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा उपयोग संबंधित तालुक्यांतील गावांसाठी करणे आवश्यक असल्याचे खासदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. इसापूर व जायकवाडी प्रकल्पांप्रमाणेच मनार प्रकल्पातूनही पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तने सोडण्याचे नियोजन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मनार प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडल्यास केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार नाही, तर परिसरातील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी वाढण्यासही हातभार लागेल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
या मागणीची तातडीने दखल घेऊन जलसंपदा विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत आणि नायगाव, बिलोली व कंधार तालुक्यांसाठी मनार प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याची दोन आवर्तने उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रही मागणी खासदार रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.