नांदेड : नांदेड येथील 20 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाला ‘राष्ट्रीय जलदिन’ म्हणून घोषित करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाड चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक समता, मानवी हक्क आणि जलसमानतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा आहे. पाण्यावरचा हक्क हा मुलभूत मानवी हक्क आहे, हे या सत्याग्रहाने संपूर्ण देशाला अधोरेखित केले.
आजही देशात पाणी, संसाधने आणि समान हक्कांबाबत सामाजिक विषमता कायम आहे. अशा परिस्थितीत महाड चवदार तळे सत्याग्रहाचा विचार, संघर्ष आणि संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी विद्रोही साहित्य संमेलन हे परिवर्तनवादी विचारांचे प्रभावी व्यासपीठ असल्याने, या संमेलनात 20 मार्च - राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव घेण्यात आला.
विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या अनेक साहित्यिकांनी ही मागणी पूर्णत्वासाठी लेखणीतून, वाणीतून प्रबोधन करण्याची ग्वाही दिली. तसेच या मागणीला व्यापक स्वरुप येण्यासाठी प्रयत्नशील राहू असे देखील सांगितले. दरम्यान, या संमेलनात पत्रके वाटून जनजागृती सुद्धा करण्यात आली. या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर हे दोन वर्षापासून सातत्याने या कामी प्रयत्नशील आहेत.
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्याचा ठराव यापूर्वी दाभड तसेच किनवट येथे अलिकडेच झालेल्या राष्ट्रीय धम्म परिषदांमधून घेण्यात आला.