नांदेड : ज्यांच्या मनात माणसांविषयी कणव असते, असे मन समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषमतावादी घटनेची नोंद घेत असते. संवेदनशील मनाने घेतलेल्या नोंदी, साहित्य कवितेच्या रूपाने समोर येतात. त्यातून जनसामान्यांचे जगणे सुसह्य व्हावे, अशी भावना व चिंतन असतेच. समाजात वावरताना सभोवताली घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना साहित्य आणि कवितेमधून व्यक्त होत असतात, असे प्रतिपादन २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी येथे शनिवारी व्यक्त केले.
येथील राजा ढाले साहित्यनगरी, सदाशिराव पाटील क्रीडा संकुल मैदानावर शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी आयोजित २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून लोकनाथ यशवंत बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन दिल्ली येथील बहुभाषिक समीक्षक डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक राणा, विचारवंत डॉ. मिलिंद आव्हाड, डॉ. राजेंद्र गोणारकर, स्वागताध्यक्ष राहल प्रधान आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना लोकनाथ यशवंत म्हणाले, माणसाच्या जगण्याचा स्तर सतत उंचावत जावा म्हणून व्यवस्थेविरूद्ध जो-जो बंड करतो, तो विद्रोहीच असतो. कारण आपले साहित्य आपली प्रतिक्रिया असते. कविना परिस्थितीनुसारच कविता सुचतात. त्यात स्वतःचे काहीच नसते. सगळे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. एखादा विषय डोक्यात आला की सतत मनात घोळत असतो. त्या विषयाचे सतत मनन चिंतन सुरू असते. माझ्या प्रत्येक कवितेचे विषय वास्तव आणि जिवंत आहेत. नव्हे माझ्या स्वभावाशी निगडित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यवस्थेचे रूप उघडे करणारे साहित्य साहित्यिक व कविंना अभिप्रेत असते. प्रत्येक कालखंडात एक व्यवस्था कार्यरत असते. ती त्या काळाला घडवित असते किंवा गिळंकृत करीत असते. या व्यवस्थेचे पुरस्कर्ते ती तशीच ठेवण्यात धन्यता मानतात. अनादिकाळापासून व्यवस्था सामान्यांना गुलाम करीत आलेली आहे. हाडामासाच्या माणसाला बहिष्कृत करणारी व्यवस्था कार्यरत असल्याची खंत लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केली.
आपल्या कवितांच्या निर्मितीबाबत बोलताना लोकनाथ यशवंत म्हणाले, मला मानवजातीचे सुख, संपन्न जीवन महत्त्वाचे वाटते. त्यामुळे माझ्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस राहिला आहे. व्यवस्था परिवर्तन हे तिचे ध्येय व उद्दिष्ट आहे. मला परिवर्तन अपेक्षित आहे. माणूस हा सर्वश्रेष्ठ मानणारे साहित्य हवे. माणूस हा निसर्गाचा आहे निसर्ग हा माणसासाठी आहे. पण व्यवस्थेने त्याला निसर्गापासून हिरावून घेतले. माणूस हा सर्वांचा निर्मिक म्हणजे तो अलौकिक अर्थाने नाही, तर लौकिक अर्थाने आहे. एका हाकेत लाखो माणसांचा आक्रोश आणि साध्या चालण्यातही करोडो पावलांचा समूह हवा. पलायनवादी माणसे नकोत.
सर्जनशील कवी, कलावंत, सांस्कृतिक मूल्यांचा परिचय आपल्या ज्या कलाकृतीतून आणून देत असतो, त्या कलाकृतीला समर्थ बळ प्राप्त करून देत असतो. साहित्यातून सांस्कृतिक मूल्य अधिष्ठित होणे अगत्याचे आहे. संघर्षाची चित्रे उत्कट आणि विचार प्रचोदक हवी. दलित सांस्कृतिकतेला फार मोठे संदर्भ असून परिपक्व वैचारिकतेचा वारसा असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटक डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांनीही वास्तववादी परिस्थितीवर अत्यंत मार्मिक सुसंवादातून लक्ष वेधले. विविध प्राचिन संत साहित्यांचा संदर्भ देत त्यांनी राज्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. प्रजेवर अत्याचार करणाऱ्या राजाला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, अशा राजाविरुद्ध लढा दिला पाहिजे, असे सांगताना डॉ. तिवारी यांनी ढोंगी योगी आणि साधूंच्या विषारी विचारांपासून साधव राहण्याचा इशारा अनेक संत साहित्यात दिल्याचे नमूद केले.
दहशतवादाबद्दल संमेलनात चिंता
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलने घेण्यामागची भूमिका स्पष्ट करताना साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाढत्या दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांविरुद्ध आपल्या साहित्याच्या माध्यमातून लढणाऱ्या कवी, साहित्यिकांवर झुंडशाहीने, उन्मादाने हल्ले होत आहेत. याविरुद्धही अशा साहित्य संमेलनातून आवाज उठविला पाहिजे, असे मत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केले.