किनवट ः तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने निर्णायक पावले उचलत बुधवारी (दि. 07) रोजी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून, या घटनेने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोंन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील मौजे सावरी परिसरात दुपारच्या सुमारास सापळा रचला होता. यावेळी अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी वाहने रंगेहाथ पकडण्यात आली.
कारवाईदरम्यान वाहनचालकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाचारण केल्याचे लक्षात येताच तस्करांनी मुद्देमाल सोडून घटनास्थळावरून पळ काढला. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय, किनवट येथे जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी वासुदेव तायडे, दीपक पडोळे, संतोष बल्लाळ, विश्वास फड, हरीश यादव, आदिनाथ डुकरे, श्रीनिवास रेड्डीवार, अक्षय महल्ले, अजय लहानकर, रामदास शेडगे, विक्रम चौधरी, महसूल सेवक गजानन तरपे, संतोष बिल्लोलवार, एस. ए. हंबर्डे यांच्यासह पोलिस निरीक्षक गणेश कराड व पोलिस कर्मचारी आर. एस. डुकरे यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात महसूल प्रशासन यापुढेही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सहायक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोंन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी दिला आहे.
तर कठोर कारवाई
अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात महसूल प्रशासन यापुढेही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सहय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोंन्तुला आणि तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी दिला आहे.