

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः लेखन-प्रकाशनचौर्य ही वाङ्मयीन जगतातील प्रचलित कृती आता राजकीय क्षेत्रातही उतरली असून नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीत 140 वर्षांची गौरवशाली परंपरा सांगणाऱ्या काँग्रेसने या पक्षाचे माजी नेते, भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे 2017 सालच्या मनपा निवडणुकीतील मनोगत जशास तसे उचलले आहे.
काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते तसेच खासदार रवींद्र चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. निवृत्त अधिकारी एकनाथ मोरे यांनी संपादित केलेला काँग्रेसचा जाहीरनामा बाहेर आल्यानंतर या पक्षाने केलेली उचलेगिरी उघड झाली. त्यावरून खा.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उद्देशून सणसणीत टोला लगावला आहे.
नांदेड मनपाच्या 2017च्या निवडणुकीत काँग्रेसने ‘विचारांतून विकासाकडे’ या शीर्षकाचा शाश्वत विकासाची हमी देणारा जाहीरनामा नांदेडकरांसमोर ठेवला होता. या जाहीरनाम्याचे जनक पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘असावे शहर आपुले छान’ या मथळ्याखाली आपले व्यापक निवेदन नांदेडकरांसमोर ठेवले होते. पक्षाची गौरवशाली परंपरा सांगताना या निवेदनातून त्यांनी तेव्हा भाजपावर संयत परंतु लक्ष्यवेधी निशाणा साधला होता. घरोघर गेलेल्या त्या जाहीरनाम्याने काँग्रेसला निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले होते.
आताच्या निवडणुकीत खा.अशोक चव्हाण यांनी भाजपाचा जाहीरनामा नांदेडकरांसमोर नववर्षाच्या पहिल्याच दिनी नांदेडकरांसमोर सादर करताना ‘चला, आता परिवर्तन घडवू या’ असा निर्धार केला. भाजपाच्या या जाहीरनाम्यानंतर इतर पक्षांमध्ये जाहीरनामा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली असून या दोन पक्षांच्या संयुक्त जाहीरनाम्यात खा.रवींद्र चव्हाण आणि वंचितचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे निवेदन प्रारंभी देण्यात आले असून खा.चव्हाण यांच्या निवेदनातून काँग्रेसची उचलेगिरी स्पष्ट झाली. अशोक चव्हाण यांच्या मागील निवेदनातील 9 परिच्छेद खा.रवींद्र चव्हाण यांच्या नावानिशी प्रकाशित झाल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले, खा.अशोक चव्हाण?
नांदेड येथील भाजपाच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जे वाक्य बोललेच नव्हते त्यावरून माझ्यावर गरळ ओकून बदनामी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नांदेड काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मनोगतात करण्यात आलेल्या उचलेगिरीबद्दल लाज वाटणार आहे का?