जळकोट: अतिवृष्टी, पूर, तिरु नदीचा रुद्रावतार, पुलांची कमतरता या समस्या जळकोट तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या हाहाकाराने तालुक्यातील अनेक जणांचे बळी घेतले आहेत. सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी तिरु नदीत बुडाल्याने मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कौशल्या अजय वाघमारे (35) रुक्मिणी अजय वाघमारे (14) अशी बुडून मरण पावलेल्या मायलेकींचे नावे आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मरसांगवी (ता. जळकोट ) येथील अजय माणिक वाघमारे यांची पत्नी कौशल्या अजय वाघमारे व मुलगी रुक्मिणी अजय वाघमारे या मायलेकी सकाळी 11 वाजता घरून नदी पलीकडे असलेल्या शेताकडे नदीपात्र ओलांडून जात होत्या. मात्र तिरु मध्यम प्रकल्पातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने दोघीही पाण्यात वाहून गेल्याने दोघींचा मृत्यू झाला.
पूल असता तर ही दुर्घटना घडली नसती
मरसांगवी येथे शेताला जाण्याच्या ठिकाणी पूल असता तर ही दुर्घटना घडली नसती. पण अनेकवेळा मागणी करूनही पूल उभारण्यात येत नसल्याने शेतकरी व नागरिक यांना जीव धोक्यात घालून भर नदीपात्रातून शेताला ये-जा करावी लागत आहे. तिरु नदीमध्ये वाहून जाऊन जीव गमवण्याच्या घटना जळकोट तालुक्यात सातत्याने घडत आहेत. अतिवृष्टी, पूर यांचा धोका तिरु नदीचा रुद्रावतार, पुलांची समस्या यामुळे नागरिकांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक तेथे पूल उभारण्यात यावेत तसेच या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.