

BJP faces challenge from allies in Kuntur ZP group
विशेष प्रतिनिधी
नांदेड : आपल्याच शिक्षणसंस्थेच्या शाळेमध्ये लिपिकपदावर नियुक्त असलेल्या नांदेड जिल्हा परिषद तसेच नायगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मधुमती राजेश कुंटूरकर यांनी आता जि.प.च्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच त्यांना आव्हान देण्याची तयारी भाजपाच्या मित्रपक्षानेच चालवली आहे. या संभाव्य लढतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी बळ दिले आहे.
नायगाव तालुक्यात कुंटूर आणि बरबडा या जिल्हा परिषद गटांमध्ये यंदा मोठी चुरस दिसत आहे. जि.प.चे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटले असून विदर्भकन्या असलेल्या मधुमती यांना माहेरहूनच ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. कुंटूर गट याच प्रवर्गासाठी तर बरबडा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटला आहे. दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभापतीपद भूषविलेल्या मधुमती कुंटूरकर ह्या मागील काही वर्षांपासून आपल्याच संस्थेच्या शाळेमध्ये लिपिकपदावर नोकरी करत असल्याचे मध्यंतरी समोर आले होते.
आता त्या कुंटूर गटात भाजपाच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात आहेत. माजी खासदार व राज्यमंत्री तसेच जि.प.चे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषविलेले गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्नुषा या नात्याने मधुमती यांनी नायगाव पंचायत समिती तसेच नांदेड जि.प.त कुंटूर भागाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांचे पती राजेश कुंटूरकर हे गंगाधररावांचा राजकीय वारसा चालवत असून त्यांनी कुंटूरमध्ये आपल्या सहचारिणीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनीही कुंटूर गटात आपली पत्नी दीपाली होटाळकर यांना उभे करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक शनिवारी दुपारनंतर नायगाव येथे भरली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, आ.प्र.गो. चिखलीकर, मोहन हंबर्डे, वसंत पाटील सुगावे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच नायगाव तालुक्यातील विविध गट-गणांतले इच्छूक उमेदवार बैठकीस हजर होते. होटाळकर यांचे मूळ गाव नरसी जि.प. गटामध्ये आहे. हा गट मागासवर्गीय प्रवर्गासाठी सुटल्यामुळे होटाळकर यांना स्वतःसाठी वाव राहिलेला नाही. पण नायगावलगतच्या कुंटूर गटात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे आपल्या पत्नीसाठी त्यांनीही चाचपणी सुरू केली आहे. दीपाली होटाळकर यांना माहेरहूनच ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
वरील बैठकीमध्ये बोलताना होटाळकर यांनी आम्ही कुंटूरमध्ये चाचपणी करत असल्याचे प्रथमच जाहीरपणे सांगितले. कुंटूर हा आपलाच बालेकिल्ला आहे, असे तेथील प्रस्थापितांनी समजू नये. त्या भागात अनेक विकासकामे रखडली असून स्थानिक नेतृत्वावर लोकांचा रोष दिसत आहे, असे नमूद करून होटाळकर यांनी जनतेने प्रतिसाद दिला तर निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्तव्याची नोंद घेत खतगावकर यांनी त्यांच्या मनोदयास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बळ दिले.
घुंगराळ्यात कार्यकर्ता मेळावा
नायगाव येथील बैठक झाल्यानंतर वसंत सुगावे यांनी बरबडा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा घुंगराळा येथे आयोजित केला होता. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन आ. चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुगावे यांच्या पत्नी वर्षा सुगावे ह्या बरबडा गटात निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. या निमित्ताने सुगावे परिवाराने मोठे शक्तिप्रदर्शन केले. आ. चिखलीकर यांनी सुगावे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पक्षनेते व अधिकाऱ्यांशी सुगावे यांनी चांगले संबंध राखून आपल्या भागातील अनेक कामे मार्गी लावली आहेत, असे चिखलीकर यांनी नमूद केले.