

Nanded Sand mining in Mudkhed's green belt
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नदीपात्रातील वाळुच्या अवैध उपश्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश जणू नांदेड तालुक्यापुरते मर्यादित आहेत, असा समज मुदखेड तहसीलदारांनी करुन घेतला असावा. त्यामुळेच नांदेड तालुक्यातील वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट करण्यात आले; परंतु मुदखेड तालुक्यातील साहित्याद्वारे अद्याप उत्खनन सुरुच आहे.
वास्तविक मुदखेड हा परिसर हरित पट्टा म्हणून घोषित आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या बाबतीत या भागात अधिक काटेकोर नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात चित्र उलटे दिसते. मन्याड नदीच्या पात्रातून वाळुचा होणारा अवैध उपसा हा राज्यभर परिचित आहे; परंतु गोदावरी नदीतूनही मोठ्या प्रमाणात व निरंकुशपणे उपसा होत असतो.
महसूलचे हात बांधले गेल्याने पोलिसांना याबाबत मोहीम उघडावी लागली. अखेर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः दखल घेत सक्त ताकिद दिल्यानंतर नांदेड तालुका प्रशासन कामाला लागले. त्यांनी जिलेटिनच्या माध्यमातून बोटी व अन्य साहित्य जाळून नष्ट केले. त्याची जिल्हाभर भरपूर चर्चा सुद्धा झाली.
मुदखेड तालुक्यात शंखतीर्थ, वासरी, टाकळी या घाटांवर वाळुचा निरंकुश उपसा सुरु असतो. या ठिकाणी वाळुचा उपसा करण्यासाठी बिहारी मजूर ठेवण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांत होती. वाळुच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याचा दैनंदिन त्रास ग्रामस्थ व प्रवाशांना सहन करावा लागतो. काही मुठभरांच्या हव्यासापोटी पर्यावरणासोबत पायाभूत सुविधांची वाट लागत असली तरी तालुका प्रशासनाला सोयरसुतक दिसत नाही. नदिड तालुक्यात प्रशासनाने धडक कारवाई केल्यानंतर जिल्हाभर त्याचे परिणाम होतील, अशी अपेक्षा होती ; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. हाकेच्या अंतरावरील मुदखेड तालुक्यात मात्र अद्याप उपसा करणारे साहित्य सुरक्षित आहे.
कोणाचीही गय नाही
"जिल्ह्यात कुठेही वाळुचा अवैध उपसा सुरु असेल तर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. प्रशासनाची पथके सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवून आहेत".