ATM machine Theft : नांदेडमधील एटीएम मशीन चोरीचा तपास थंडच... Pudhari
नांदेड

ATM machine Theft : नांदेडमधील एटीएम मशीन चोरीचा तपास थंडच...

१५ दिवस उलटले, पथके कुठे? पोलिसांचे हात रिकामेच

पुढारी वृत्तसेवा

Investigation into ATM machine theft in Nanded remains cold

संतोष जोशी

नांदेड : नांदेड शहरातील तरोडा खुर्दे भागातून एसबीआय बँकेची चक्क एटीएम मशिन चोरट्यांनी पिक व्हॅनमधून पळवून नेली. या एटीएम मशिन मध्ये तब्बल ६ लाख ७३ हजार एवढी रक्कम होती. ही घटना २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. या घटनेनंतर नांदेडच्या पोलिसांनी चोरट्यांच्या शोधात विविध पथके तयार करुन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मात्र, चोरट्यांना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होता आले. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांच्या हातात कुठलेही धागेदोरे सापडले नसून, अद्यापही पोलीसांचे हात रिकामेच आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चार ते पाच जणांनी मिळून चैतन्य नगर जवळ तरोडा खुर्दे भागात एसबीआय बँकेचे एटीएम मशिन आहे. हा भाग अत्यंत गजबजलेला असतो. विशेष म्हणजे, एटीएम वर सुरक्षा नसल्याचा फायदा घेत. चोरट्यांनी अगोदर रेकी करुन हा एटीम मशीन चोरीचा प्लान यशस्वी केला आहे. मात्र, या घटनेमुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले असून, घटनास्थळावर श्वान पथक, ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले मात्र, त्याचाही फारसा उपयगोग पोलिसांना झाला नाही.

चोरट्यांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या प्लान करुन अवध्या कांही मिनिटांत एटीएम मशीन एका चॉकलेटी रंगाच्या पिकअप व्हॅनमध्ये चोरटे एटीएम मशिन सहज उचलून नेली. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, चार ते पाच चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेची टिम व भाग्यनगर पोलीस ठाण्याची टिम घटनास्थळावर धाव घेऊन चोरट्यांच्या शोधा लागली.

पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी चोरांच्या शोधात तातडीने विविध पथके तयार करुन रवाना केली. एटीएम चोरांनी हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील एका शेतात एटीएम मशीनचा सांगळा पोलिसांना सापडला. चोरटे कोणत्या दिशेने हे पोलिसांना कळून ही चोरट्यांचा शोध अद्याप लागला नाही.

महिण्या अगोदर दोन ते तीन वेळा एटीएम फोडण्याच्या घटना नांदेड मध्ये घडल्या होत्या. पोलीसांनी चोरांना त्यावेळी अटक केली. मात्र, चोरट्यांच्या टोळीने एटीएम मशिन पळवून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. एटीएम मशिनपळवून १५ दिवस लोटले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती चोरट्यांच्या कुठलाही धागेदोरे लागले नाहीत. त्यामुळे एटीएम चोरीचा सुगावा कधी लागेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर

नांदेड जिल्हयात वारंवार एटीएम मशिन फोडण्याचा व लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. शिवाय एटीएम मशिन मधून पैसे काढल्यानंतर ग्राहकाला लुटण्याचा प्रकार घडलेला असताना. बँका केवळ एटीएम मशिन जवळ लावलेल्या सिसीटीव्हीच्या भरवश्यावर राहिले. विविध बँकातील एटीएम मधून दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, या ठिकाणी साधा सुरक्षा रक्षक ठेवण्याचे कष्ट बैंका घेत नसल्याने एटीएम फोडणे किंवा पळविण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. पोलिसांनी बँकाना वारंवार सुचना देऊनही बैंक सुरक्षाच्या बाबतीत गांभीर्य दाखवत नसल्याने एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT