

Nanded News: 'Water Grid' work slow
विठ्ठल फुलारी
भोकर : तालुक्यातील ८० गावांत जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या असल्या तरी, या योजनेतून विहिरी नामंजूर झाल्या असल्याने भोकर तालुक्याकाला वॉटर ग्रीड योजनेच्या पाण्याची मदार होती. परंतु, या वॉटर ग्रीड योजनेच्या कामाला सुरुवात होवून पाच वर्षे उलटली तरही अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. खरं म्हणजे २०२४ पर्यंत हे काम संपवून तालुक्यातील प्रत्येक गावांत शुद्ध पाणी पोहोचणे गरजेचे होते. पण या कामाला विलंब होत असल्याने भोकर तालुक्यासाठी हे वर्षे खडतर जाणार असून अनेक कुटुंबांना विकतचे पाणी घ्यावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई मार्गी लावण्यासाठी मागील काळात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत भरमसाठ खर्च करण्यात आला. परंतु, याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना झाली नाही. परिणामी तालुक्यातील अनेक गावांतील कुटुंबांना सध्या खाजगी स्त्रोतांचे पाणी दोन ते पाच हजार रुपये वैयक्तिक खर्चुन घ्यावे लागत आहे.
तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून घर तिथे नळजोडणी देण्याच्या कामाला सुरुवात झाली असताना यास वॉटर ग्रीड योजनेची साथ मिळाली. एका माणसाला दरदिवशी ५५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक होते.
गावाला वॉटर ग्रीड योजनेतून पाणी उपलब्ध होणार असल्याने जलजीवन योजनेतून विहीरी वगळण्यात आल्या. यामुळे बेंबर, हस्सापूर व कामनगाव वगळता अन्य गावात विहीर खोदली जाणार नाही.
सध्या जलजीवन योजेचे काम काही गावात सुरू झाले तर काही गावात सुरू होत आहे. अनेक ठिकाणचे जलजीवन चे काम अपूर्ण आहेत. जलजीवन योजनेतून ७७गावाच्या विहिरी वगळण्यात आले असल्याने या गावांना वॉटर ग्रीड योजनेच्या पाण्याची वाट पहावी लागणार आहे. वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित होण्यासाठी आणखी अवधी लागणार असल्याने या योजनेचे शुद्ध पाणी गावात पोहोचणार असून तोपर्यंत ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागणार आहे.
भोकर तालुका मागील तीन वर्षांपूर्वी टँकरमुक्त झाला होता. पण मागील वर्षीपासून पुन्हा टँकर सुरू झाले. तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करणे गरजेचे होते. या वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून भोकर तालुक्यातील घराघरात शुद्ध पाणी येणार असले तरी याला आणखी बराच कालावधी लागणार आहे.
६२८ पैकी १८२ हातपंप कायमस्वरूपी बंद
भोकर तालुक्यात ६२८ हातपंप आहेत. यापैकी १८२ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. सध्या ४२८ हातपंप पैकी १५६ हातपंप आठ महिने चालू असतात. तर २७२ हातपंप वर्षभर चालू असतात. पण, हे हातपंप पुढील काही वर्षांत बंद पडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अति रासायनिक खतांचा वापर झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाले. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली. परिणामतः जास्त पाऊस होवून ही जमिनीत पाणी मुरत नाही. यामुळे दरवर्षी पाणी टंचाई उग्र स्वरूप धारण करणार आहे.