Nanded News : कंधारमध्ये आज विविध विकासकामांचे लोकार्पण file photo
नांदेड

Nanded News : कंधारमध्ये आज विविध विकासकामांचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन व सभा

पुढारी वृत्तसेवा

Inauguration of the Sub-District Hospital and a public meeting, held by Deputy Chief Minister Sunetra Pawar

कंधार, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी कंधार येथे विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय, शांतिदूत गोविंदराव चिखलीकर उद्यान आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा समावेश आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार असून, या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या पुढाकारातून या भागातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण होत असल्याचे आ. चिखलीकर यांनी सांगितले.

कंधार येथे १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले असून, महाराष्ट्रातील मॉडेल रुग्णालयाच्या धर्तीवर येथे आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे कंधारसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

कंधार नगर परिषदेच्या वतीने पाच कोटी रुपये खर्चुन शांतिदूत गोविंदराव चिखलीकर उद्यान विकसित करण्यात आले आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची व्यवस्था आणि नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

तसेच कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळावी, यासाठी दोन कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नतन इमारतीचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. या सर्व विकासकामांच्या लोकार्पणानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला सुमारे २० हजार नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री मेघना बोर्डीकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.

कंधार आणि लोहा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT