संजीव कुळकर्णी
नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटविण्याच्या मागे पक्षातल्याच विदर्भातील एका नेत्याचा ‘हात’ असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत गेलेल्या एका शिष्टमंडळाने आपल्या विरुद्ध मांडलेल्या मुद्द्यांची पक्षश्रेष्ठींनी जरूर चौकशी करावी, असे सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले.
माजी मंत्री अनिल पटेल व वेगवेगळ्या जिल्ह्यांतील काही आजी-माजी पदाधिकार्यांनी सपकाळ यांना तात्काळ पदावरून हटवावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाध्यक्षांची गेल्या सोमवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. या तक्रारकर्त्यांनी पक्षाध्यक्षांसह इतर नेत्यांना दिलेल्या निवेदनातील मुद्यांची माहिती मिळाल्यांनतर सपकाळ यांनी त्यावर भाष्य केले नाही. पक्षनेत्यांना त्यात तथ्य वाटले तर ते चौकशी करतील, असे सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या माझ्याकडून नव्हे, तर अ.भा.काँग्रेस महासमितीकडून झालेल्या आहेत. माझ्या विरोधात आर्थिक बाबी किंवा अन्य आक्षेपार्ह मुद्द्यांवर तक्रार करण्यास त्यांना वाव नव्हता. मग पक्ष संघटनेतील बाबी पुढे करून त्यांनी निवेदन तयार केले असावे असा अंदाज प्रदेशाध्यक्षांनी वर्तविला. मी पूर्वी ‘अभाविप’मध्ये होतो, हा शोध कोणी व कसा लावला ते कळाले नाही, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या विरोधातील या मोहिमेला पक्षाच्याच एका माजी पदाधिकार्याची फूस असल्याचे सपकाळ यांचे म्हणणे आहे. दिल्लीत गेलेले बहुसंख्य प्रतिनिधी वरील नेत्याच्या संपर्कातील आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये काही ठिकाणचे निर्णय चुकले असतील; पण पक्षश्रेष्ठींनी केलेल्या नियुक्त्यांवर त्यांच्याकडे जाऊन तक्रार करणार्यांवर मी काय अधिकार बोलणार, असा सवाल सपकाळ यांनी केला.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येत्या २३ जून रोजी नांदेड दौर्यावर येत आहेत. पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा त्यांच्या उपस्थितीत होणार असून शेतकर्यांची कर्जमाफी तसेच अन्य काही मुद्यांवर त्याचदिवशी काँग्रेस पक्षातर्फे आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नवे जिल्हाध्यक्ष (उत्तर ग्रामीण) विठ्ठल पावडे यांनी दिली.
बालाजी चव्हाण आघाडीवर!
नांदेडमधील बालाजी चव्हाण हे काँग्रेसच्या महानगर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, पण त्यांचा विचार झाला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या विरोधातील मोहिमेत बालाजी चव्हाण आघाडीवर आहेत. ते माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्ती समर्थक म्हणून ओळखले जातात. सपकाळ यांनी त्यांच्या या मोहिमेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.