नांदेड : समाज माध्यमांतील वैयक्तिक खात्यावर शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या सकारात्मक, समाजोपयोगी कामांची प्रसिद्धी करता येईल, परंतु त्यात स्वतःचा उदोउदो करता येणार नाही. शिवाय स्वतःचे गणवेषातील फोटो, पदनाम तसेच लोगो व्हायरल करता येणार नाहीत. महाराष्ट्र शासनाने सोमवारी (दि. २८) हे आदेश जारी केले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मिडियाच्या माध्यमातून माहितीचे आदान प्रदान, समन्वय तसेच संवाद साधला जातो. याद्वारे लोकसहभाग वाढविण्यास मदत होते. सोशल मिडियात फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, यु-ट्युब यासारख्या विविध व्यासपीठांचा समावेश आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्षणात माहिती पोचविण्यासाठी ही माध्यमं उपकारक आहेत. अनेकजण त्याचा सकारात्मक वापर करतात; परंतु बरेच जण गैरवापर सुद्धा करतात. त्यामुळे नाहक समस्या निर्माण होतात.
गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणून बुजून अथवा चुकून पसरविलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे, तसेचशसाकीय धोरमांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना, व्यक्तीबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करुन प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे, या प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर होतो.
हे टाळण्यासाठी शासनाने वरील पाऊल उचलले आहे. त्यानुसार राज्य शासन तसेच भारतातील अन्य कोणत्याही चालू किंवा अलिकडच्या धोरणावर किंवा कृतिवर प्रतिकूल टिका करु नये, शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने करावा, त्यांनी आपले वैयक्तिक व कार्यालयीन खाते स्वतंत्रपणे व्यवस्थापित करावे.
केंद्र तसेच राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, अँप इत्यादीचा वापर करु नये, शासकीय योजना, उपक्रम आदीच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच लोकसहभागारतीी केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करावा, कार्यालयांतर्गत कामकासाठी सोशल मिडियाचा वापर करतण्यास मुभा देण्यात आली आहे. आपल्या पदाचा उपयोग करुन किंवा त्या माध्यमातून केलेल्या सकारात्मक, लोकोपयोगी कामांची प्रसिद्धी करताना स्वयंप्रशंसा होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.