नरेंद्र येरावार, उमरी – पुढारी वृत्तसेवा
उमरी–नांदेड लोहमार्गावरील गोरठा भुयारी मार्गाचे निकृष्ट आणि नियोजनशून्य काम पुन्हा एकदा वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या कार अपघातानंतर, सोमवारी उशिरा रात्री ट्रक उलटल्याची दुसरी घटना घडली असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. या भुयारी मार्गासाठी परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि वाहनचालक यांनी अनेक वर्षांपासून उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भुयारी मार्ग उभारण्यात आला. सुरुवातीपासूनच त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. आज मात्र ते सर्व शंका सत्य ठरत आहेत. सोमवारी रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास नांदेडकडून उमरीकडे येणारा एक ट्रक, भुयारी मार्गाच्या मध्यभागी चुकीच्या नियोजनाने उभारलेल्या डिव्हायडरवर आदळला.
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रक जागीच उलटला आणि त्याची चाकेही निघून बाजूला पडली. या भीषण अपघातात चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. मोठ्या प्रमाणावर वाहनांची रांग लागली आणि लोकांना अडचणीचा सामना करावा लागला.
स्थानिक नागरिकांच्या मते, या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. पावसाळा नसतानाही जवळपास एक फूट पाणी साचून राहते. पावसाळ्यात तर स्थिती अधिक भीषण होते. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, लाइटची कोणतीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत अपघात होणं स्वाभाविकच असल्याचं वाहनचालकांचे म्हणणं आहे.
याच मार्गावर आठवडाभरापूर्वीही एक कार डिव्हायडरवर धडकली होती. त्यात महिला व लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली होती. सुदैवाने जीवितहानी टळली होती. परंतु सोमवारी झालेल्या ट्रक अपघाताने परिस्थितीची गंभीरता अधिक स्पष्ट झाली आहे.
वाहनचालकांचा आरोप आहे की, रेल्वे विभाग आणि गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे या भुयारी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य उतार नसल्याने पाणी साचते, खड्डे वाढत आहेत आणि त्यात वाहन अडकण्याचा धोका कायम आहे.
स्थानीय लोकांनी अशीही भीती व्यक्त केली आहे की, रात्रीचा अंधार आणि ओसाडपणा पाहता येथे चोरट्यांना संधी मिळू शकते, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनतो.
वाहनचालक व नागरिकांनी रेल्वे विभागाने तातडीने लक्ष घालून सुधारणा करावी, प्रकाशयोजना करावी, खड्डे बुजवावेत आणि डिव्हायडरचे योग्य नियोजन करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अपघातांची मालिका थांबवायची असेल तर गोरठा भुयारी मार्गाचे तातडीने पुनर्मूल्यांकन आणि दुरुस्ती गरजेची असल्याचे सर्वांचेच मत आहे.