

Nanded Local Body Elections
हिमायतनगर : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.१७) अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 20 तर नगरसेवक पदासाठी 190 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. तर इतर पक्षाच्या उमेदवारांनी शांततेत अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गोटात वेगळी चर्चा रंगली होती.
माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वत: उपस्थित राहून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल केले. शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेच्या उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. दिवसभर तहसील कार्यालयात सर्व पक्षांतील नेत्यांनी गर्दी केली होती.
पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्य मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. 17 वार्डासाठी एकूण 210 उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नेत्यांना अनेक इच्छुकांची मनधरणी करीत माघार घेण्यासाठी विनवणी करावी लागणार आहे.