

Nanded Rural Police conducted a combing operation on Sunday night
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड ग्रामीण पोलिसांनी रविवारी (दि.१६) रात्री कोंबिंग ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांची त्यांच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली असून, एक हद्दपार केलेला आरोपी विशाल रमेश शितळे हा घरी मिळून आल्याने, त्यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पाच पोलिस अधिकारी आणि २७ पोलिस अमलदारांचा सहभाग होता.
पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कोंबिंग ऑपरेश घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पोलिस अधिकारी व अमलदार यांच्यासह कोबिंग ऑपरेशन राबवले. बळीरामपूर, वसरणी, धनेगाव, सिडको, हडको, गोविंद कालनी, कौठा, वाजेगाव, विष्णुपुरी अशा विविध भागांत छापेमारी केली.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच शस्त्र अधिनियमामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, घरफोडीमधील आरोपी तसेच हद्दपार केलेल्या आरोपींच्या घरी जाऊन तपासणी केली.
रेकॉर्डवरील २२ गुन्हेगार चेक करण्यात आले. चोरी, घरफोडीतील ७, हद्दपार केलेले १० आरोपी तसेच ११० वाहने तपासणी करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ५ बेलेबल वारंट बजावण्यात आले तर २ नॉन बेलेबल वारंटमध्ये आरोपी अटक केले आहे. तसेच हद्दपारीचे आदेश असतानाही विशाल रमेश शितळे हा घरी आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश नाईक, पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, व्यंकट कुसमे, परमेश्वर कदम व २७ अमलदारांनी केली.