मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे कार्यकर्ते शासन जीआर जाळून निषेध करताना (Pudhari Photo)
नांदेड

Nanded Farmers Protest | नांदेड जिल्हा विशेष पॅकेजमधून वगळल्याने शेतकरी संतप्त, मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्यावतीने शासन जीआर जाळून निषेध

शासनाविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Mukhed Shetkari Putra Sangharsh Samiti protest

मुखेड : अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्ह्याला पूर्णतः वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१०) मुखेड तहसील कार्यालयात शेतकरी पुत्र संघर्ष समितीतर्फे शासनाच्या निर्णयाचा निषेध करत जीआरची होळी करण्यात आली. या वेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार राजेश जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेतकरी पुत्र संघर्ष समितीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुखेड तालुक्यातील भीषण पूरस्थितीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. लेंडी प्रकल्पातील पुराने अनेक गावे जलमय झाली, हसनाळ येथे ५ जणांचा मृत्यू झाला, तर मुक्करमाबाद येथे सुमारे १०० जनावरे वाहून गेली. रावणगाव, भिंगोली, भेडेगाव आणि परिसरातील इतर गावांमध्येही पूरस्थिती निर्माण झाली होती. इतकी गंभीर परिस्थिती असताना शासनाने नांदेड जिल्ह्याला वाढीव पॅकेजमधून वगळले, हे शेतकऱ्यांच्या भावनांशी केलेला अन्याय आहे.

शासन निर्णय क्रमांक : सिएलएस–२०२५/प्र.क्र.३६५/म-३ (मदत–१) दिनांक ९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला असून, त्यामधून नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. यापूर्वी जारी झालेल्या शासन निर्णय क्रमांक : सिएलएस–२०२५/प्र.क्र.२३५ (भाग–६) म–६ मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, नव्या निर्णयात जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

या संदर्भात बालाजी ढोसणे म्हणाले की, “गावे उद्ध्वस्त झाली, माणसे व जनावरे वाहून गेली, लाखो हेक्टर पिके नष्ट झाली, तरीही राज्य शासन शेतकऱ्यांची थट्टा का करत आहे?”

प्रदीप इंगोले हसनाळकर यांनी शासनावर टीका करत म्हटले की, “इतक्या भयंकर परिस्थितीतही सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे.”

तुकाराम सुडके यांनी सांगितले की, “नांदेड जिल्ह्याला या पॅकेजमध्ये समाविष्ट करून शुद्धिपत्रक तात्काळ काढावे, अशी मागणी आम्ही तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली आहे.”

यावेळी घोषणाबाजीने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात बालाजी ढोसणे, बालाजी सांगवीकर, गिरीधर केरूरकर, तुकाराम सुडके, प्रदीप इंगोले, शंकर चिंतमवाड, रमाकांत जाहुरकर, माधव खदगावे, बळवंत बोडके, निळकंठ कोळनुरकर, प्रशांत देशमुख, हनमंत चव्हाण, विशाल येवतीकर, दिगंबर गोजेगावकर, बालाजी सोनकांबळे, नागनाथ गोजेगावे, चांदपाशा शेख, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग राठोड, संभाजी हळदे, योगेश मामीलवाड, शिवराज भूरे यांसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT