D.Y .Patil pudhari photo
नांदेड

D.Y. Patil death : ‘शंकररावांसाठी सह्यांची मोहीम राबविलेला नेता’

डी.वाय.पाटील यांच्या नांदेडशी संबंधित काही आठवणी...

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार तसेच राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर त्यांच्या नांदेडशी तसेच शंकरराव चव्हाण यांच्याशी संबंधित काही आठवणी समोर आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन नेत्यांना न जुमानता ‘डी.वाय.’ यांनी शंकरराव मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती, ही एक बाब त्यातून समोर आली.

आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात डी.वाय.पाटील दोनदा आमदार झाले. शंकरराव १९७५ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातून डी.वाय. यांना स्थान मिळणार होते; पण तेव्हा त्यात त्याच भागातील त्यांच्या विरोधकांनी खोडा घातल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. नंतरच्या काळात शंकररावांनी पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात वेळोवेळी मोलाची मदत केली. शंकरराव हयात असेपर्यंत या दोघांमधील सौहार्द कायम होता.

शंकरराव आणि डी.वाय. यांच्यातील स्नेहबंध १९७०च्या काळात जुळले. वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अखेरच्या पर्वात राज्याचे सर्वोच्च पद मराठवाड्यास दिले जावे, यासाठी वेगवेगळ्या समुहांकडून प्रयत्न झाले होते. त्यात डी.वाय.पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात ते कोल्हापुरातील पन्हाळा-गगनबावडा मतदारसंघाचे आमदार होते.

शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या स्मृतिग्रंथामध्ये डी.वाय.पाटील यांचा विस्तृत लेख आहे. त्यामध्ये त्यांनी ५० वर्षांपूर्वीच्या काही घटना-प्रसंगांचा उल्लेख केला होता. पाटबंधारे व वीज खात्यात शंकररावांनी केलेेले महत्त्वपूर्ण कार्य पाहून मी त्यांचा चाहता झालो, असे त्यांनी नमूद केले आहे.

वरील लेखात डी.वाय.पाटील यांनी शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी झालेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी शंकररावांचीच निवड व्हावी, यासाठी त्यांनी अनेक आमदारांच्या भेटी घेतल्या होत्या.

महाराष्ट्रातील अनेक आमदारांना भेटून त्यांच्या सह्या मिळविण्यात पाटील यांना यश आले. आमदारांच्या सह्या असलेले निवेदन त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सादर केले होते. नंतरच्या काळात शंकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर डी.वाय.पाटील त्यांचे निकटवर्तीय झाले.

  • पुढील काळात शंकरराव राज्यातून देशाच्या राजधानीमध्ये गेले. १९८१ ते ८४ या काळात ते केंद्रीयमंत्री असताना पाटील यांचा त्यांच्याशी नित्य संपर्क राहिला. याच कालावधीत शंकररावांकडे संरक्षण खात्याचे मंत्रीपद होते, तेव्हा दिल्लीतील मिलिटरी कॅम्पमधील चार जुन्या जीप पाटील यांनी विहित प्रक्रियेनुसार विकत घेऊन दुरूस्त करून घेतल्या होत्या. नंतर या चारही जीप त्यांनी १९८४च्या निवडणुकीत शंकररावांच्या प्रचारासाठी नांदेडला पाठविल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT