नरहर कुरुंदकर संशोधन केंद्रात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. काशीनाथ देवधर. pudhari photo
नांदेड

Dr.Kashinath Devdhar : संरक्षण क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने

शास्त्रज्ञ डॉ. काशीनाथ देवधर ः नरहर कुरुंदकर संशोधन केंद्रात व्याख्यान

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः मागील काही दशकांमध्ये भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायझेशनने विविध प्रकारची शस्त्रे विकसित केली आहेत. त्यामुळे आपले शस्त्रास्त्र आयात करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. म्हणजेच देश संरक्षण क्षेत्रात झपाट्याने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन ‌‘डीआरडीओ‌’ मधील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशीनाथ देवधर यांनी शनिवारी येथे केले.

नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने ‌‘भारताची संरक्षण सिद्धता आणि आत्मनिर्भरता‌’ विषयावर डॉ. देवधर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‌‘डीआरडीओ‌’ ने विकसित केलेल्या विविध शस्त्रास्त्रांची स्लाईड्सच्या आधारे तपशीलवार माहिती दिली. तसेच त्यांचा विकास कसा कसा होत गेला याचे विवेचन केले.

काही प्रकारची शस्त्रास्त्रे आपण आज देखील आयात करीत असलो तरी नजीकच्या भविष्यात या आयातीचे प्रमाण कमी होईल. आत्मनिर्भरतेचे प्रमाण वाढल्यामुळे भारत आता शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश देखील झाला आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाने वेळोवेळी शस्त्रास्त्रांच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद केल्यामुळेच ही आत्मनिर्भरता शक्य झाली असेही ते म्हणाले.

विकासाच्या या प्रवासात आपल्याला सहभागी होता आले याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संरक्षण क्षेत्रातील विशेषतः अवकाश क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम तसेच डॉ. सतीश धवन आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे लक्षणीय योगदान आहे, असे डॉ. देवधर यांनी यावेळी सांगितले. डॉ. कलाम यांच्या बरोबर काम करण्याची आपल्याला संधी मिळाली असे त्यांनी यावेळी नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीनिवास पांडे यांनी केले. केंद्राचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. दीपनाथ पत्की यांनी डॉ. देवधर यांचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT