नांदेड ः विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आता सिटीस्कॅन आणि एमआरआय तपासण्या होणार आहेत. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अतुले सावे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
शासकीय रुग्णालयात नांदेडसह शेजारीत पाच ते सहा जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण येतात. परंतु शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन आणि एमआरआय तपासणीची सुविधा नसल्यामुळे या रुग्णांना खासगी रुग्णालयात तपासण्या कराव्या लागत होते. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. त्यात आता राज्यात नऊ ठिकाणी पीपीपी तत्त्वावर सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात नांदेडचाही समावेश होता.
परिणामी आता शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना माफक दरात या तपासण्या करून घेता येईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.