

अहमदपूर : निवडणूक प्रशिक्षणासाठी शाळेतील सर्व शिक्षक गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उदात्त भावनेतून अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील सरपंच गजानन चंदेवाड यांनी चक्क गुरुजींची भूमिका साकारली. “जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे...“ या उक्तीप्रमाणे त्यांनी दिवसभर शाळेत थांबून चिमुकल्यांना धडे गिरवायला लावले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावले जात आहे. रुद्धा येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक 24 जानेवारी रोजी प्रशिक्षणासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे मुले शाळेत आली, मात्र गुरुजी नसल्याने मुले गोंधळलेल्या अवस्थेत होती. ही बाब गावचे प्रथम नागरिक सरपंच गजानन चंदेवाड यांच्या निदर्शनास आली. मुलांचा वेळ वाया जाऊ नये आणि त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सरपंचांनी तातडीने शाळेत धाव घेतली. त्यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर मुलांशी संवाद साधत त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
गोष्टी, गाणी आणि गप्पांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत ज्ञानदान केले. दरम्यान, प्रशासनाने शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचाही विचार करावा, अशी मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. मात्र, सरपंचांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासमोर एक नवा आदर्श ठेवून गेली आहे.
अशैक्षणिक कामांचा फटका शिक्षणाला
या निमित्ताने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा व गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका, जनगणना आणि इतर सरकारी कामांमुळे शिक्षकांना शाळेबाहेर राहावे लागते. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत घट होत आहे. पटसंख्या घटणे आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे ग्रामीण शिक्षणाचा कणा असलेली ही व्यवस्था धोक्यात आली आहे.
शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असले तरी मुलांचे नुकसान होऊ नये, ही आमची जबाबदारी आहे. एक जागरूक नागरिक म्हणून मी माझ्या परीने छोटासा प्रयत्न केला.
गजानन चंदेवाड, सरपंच, रुद्धा.