

नांदेड ः दि. 26 जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेससह हरंगुळ (लातूर)-पुणे स्पेशल प्रमाणे मराठवाड्यातून येणा-या अनेक गाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच टर्मिनेट करण्याच्या निर्णयावर मध्य रेल्वे ठाम आहे. हा निर्णय मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे. या संदर्भात लोकसभा व राज्यसभेच्या सहा खासदारांनी पत्र देऊनही मध्य रेल्वेने मात्र, या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे.
दरम्यान, केवळ मेंन्टन्सचे कारण देत नांदेड-पुणे, हरंगुळ-पुणे या दोन्ही रेल्वे 26 जानेवारीपासून हडपसरपर्यंच कायम स्वरूपी धावणार आहे, असे मध्य रेल्वेकडून असे सांगण्यात आले आहे. तसेच पुणे येथे विकास कामाकरिता सोलापूर व मराठवाड्यातील या गाड्यांना हडपसरपर्यंत टर्मिनेट करण्यात येणार आहे. मात्र, गुजरात व उत्तरेकडील गाड्यांना थेट पुणे शहराशी जोडले आहे. पुणे या रेल्वेला दौंडपर्यंत वाढविण्यात आले आहे. यामुळे इंदौर ते पुणे चालणारी रेल्वे आता दौंडपर्यंत धावत आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेससह अन्य गाड्या पुणेपर्यंत धावत आहेत.
मात्र, महाराष्ट्रातील व प्रामुख्याने मराठवाड्यातील गाड्यांना हडपसरपर्यंत आता प्रवास करावा लागणार आहे. यामुळे नांदेड-मनमाड या मार्गावर एकमेव असणारी गाडी तीही हडपसरपर्यंतच राहणार आहे. याचा मोठा त्रास रुग्ण, विद्यार्थी व नोकरदार यांना बसणार आहे. प्रवाशांना प्रातः सकाळी साडेचार वाजता पोहचल्यामुळे खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
हडपसर ते पुणे जंक्शन सकाळी चार ते सहा दरम्यान, कुठल्याही प्रकारची लोकलसेवा उपलब्ध नाही. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या अन्यायकारक निर्णया विरोधात प्रवासी संघटना व जनता आक्रमक झाली आहे.
खासदारांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार
मराठवाड्यातील खासदार डॉ. अजित गोपछडे, संजय जाधव, फौजिया खान, डॉ भागवत कराड, शिवाजी काळगे, ओमराजे निंबाळकर यासोबतच बारामतीच्या खा. सुप्रिया सुळे, वर्धाचे खा. अमर काळे, यांनी प्रवाशांच्या मागणीला पाठिंबा देत मध्य रेल्वेला पत्र दिले होते. परंतु, मध्य रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळला नाही. तसेच मराठवाडा प्रवासी संघाचे अध्यक्ष अरुण मेघराज व लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष शिवाजी नरहर हे दोघे खासदारांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.