नांदेड मनपासाठी युती-आघाडीबाबत चर्चा-भेटीगाठींचे गुऱ्हाळ सुरूच ! File Photo
नांदेड

नांदेड मनपासाठी युती-आघाडीबाबत चर्चा-भेटीगाठींचे गुऱ्हाळ सुरूच !

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

पुढारी वृत्तसेवा

Discussions underway regarding an alliance/coalition for the Nanded Municipal Corporation.

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी दुपारी संपणार असली, तरी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये युती-आघाडी संदर्भातील चर्चाचे गुऱ्हाळ काल दिवसभर सुरू होते. भाजपा-शिवसेना किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. तर काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीसह इतर काही पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भातील प्रयत्न जारी ठेवले असल्याचे सोमवारच्या घडामोडींतून स्पष्ट झाले.

भारतीय जनता पार्टीन वेगवेगळ्या प्रभागांतील आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी शनिवार ते सोमवार दरम्यान बराच खल केला. त्यांतून वेगवेगळ्या प्रभागांतील बऱ्याच उमेदवारांच्या नावावर पक्षामध्ये एकमत झाल्यानंतर अशा उमेदवारांना तोंडी सूचनेद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले; पण पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी मंगळवारी दुपारनंतरच जारी केली जाणार आहे. मित्रपक्षांतील शिवसेनेसोबत युती करण्याबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी संकेत दिले होते; पण काल दुपारपर्यंत या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरले नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीसोबतही युतीच्या वाटाघाटी जारी ठेवल्या आहेत.

काँग्रेस पक्षाने मनपा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना प्रभारी केले आहे. ठाकरे शनिवारी सायंकाळनंतर नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील एकंदर परिस्थितीची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली. काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्रवादी (श.प. गट) तसेच शिवसेना (उबाठा) या पक्षांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी अंतिम झाली नसली, तरी मंगळवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे पक्षाचे खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वार्ताहर बैठकीस पक्षप्रभारी ठाकरे संबोधित करतील, असे आधी जाहीर करण्यात आले होते; परंतु दुपारी पक्ष कार्यालयात खा. रवींद्र चव्हाण यांनी श्याम दरक व अन्य पदाधिकाऱ्यांसह वार्ताहरांशी संवाद साधला. पक्षाच्या काही नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांच्या प्रभागांमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचा दावा खा. चव्हाण यांनी केला. माणिकराव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

सुधाकर पांढरे काँग्रेसमध्ये !

माजी महापौर सुधाकर पांढरे गेल्या आठवड्यात भाजपाच्या अटल स्मृती संमेलनात व्यासपीठावर हजर होते; परंतु त्यांनी सोमवारी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आणखी एक माजी महापौर व अन्य पक्षांचे काही पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे यांनी अखेर आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT