Devotees suffer greatly during the Narali Purnima Parikrama Yatra of Mahur
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा: माहूरगडावर पार पडणाऱ्या तीन मोठ्या यात्रेपैकी एक असलेल्या नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) परिक्रमा पंचक्रोशी वेढा यात्रेत सुमारे चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या तोकड्या व्यवस्थेचे पितळ उघडे पडले. परिणामी भाविकांचे प्रचंड हाल झाले.
माहर गडावर वर्षातून तीन मोठ्या यात्रा भरतात. त्यापैकी एक म्हणजे परिक्रमा यात्रा. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. गडाच्या पायथ्याशी देवी रेणुका मातेचे मंदिर आहे. या यात्रेदरम्यान भाविक देवीची पूजा-अर्चा करतात आणि परिक्रमा पूर्ण करतात.
८ ऑगस्ट रोजी श्री दत्तशिखर संस्थानच्या दत्त मंदिरातील महा पुरुषांनी 'सर्वतीर्थ' या कुंडात स्नान केले आणि भगवान दत्तप्रभू यांचे दर्शन व प.पू. श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद व परवानगी घेऊन सायं. ४ वाजता महापुरुष वासुदेव भारती महाराज यांचे नेतृत्वात परिक्रमा यात्रेला सुरुवात झाली.
पुढे काळेश्वर मंदिर, सयामाता मंदिर, मातृतीर्थ तलाव, पांडवलेणी, श्री देवदेवेवर मंदिर, बनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्त मांजरी, अनुसयामाता मंदिर, सर्वतीर्थ कुंड असा सुमारे २२ किमी अंतराची परिक्रमा करणारे लाखो दत्तभक्त दत्तशिखर मंदिरावर परतले. या यात्रेत श्री दत्तशिखर संस्थानच्या व्यवस्थेतील प्रचंड ढिसाळ पणा दिसून आला. तिथे सर्वत्र प्रचंड अस्वच्छता दिसून आली. झोपण्यासाठी निवारा नसल्याने भाविकांनी उघड्यावर रात्र काढली.
यावेळी विश्वास्तांची गैरहजेरी असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तसेच अपुरे सौचालय, वाहनतळाची त्रोटक व्यवस्था, अपुऱ्या बसेस, रस्त्यावर अस्तव्यस्त वाहने उभी केल्याने रस्त्याच्या दुतर्फा पायी चालणाऱ्या भाविकांची कुचंबना झाली होती. मातृतीर्थ तलावावर आरोग्य केंद्राचे कामकाज रात्री ८ वाजताच गुंडाळलेले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खट्टे पडलेले होते.
पथदिव्यांची सोय केली नसल्याने रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले. होते. एसटीत जागा मिळविण्यासाठी भाविकांना जीवघेणी कसरत करावी लागली. परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने अनेक भाविकांना अडचण झाली. तसेच फिरते शौचालय फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. यात्रेत खिसेकापूंनी अनेक भाविकांचे खिसे कापले यामुळे पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडल्याचे दिसून आले. यात्रा नियोजन बैठकीत कार्यालय प्रमुख व संबंधितानी मांडलेला आढावा केवळ कागदापुरताच मर्यादित राहिल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झाली. एकंदरीत यात्रेशी निगडित असलेल्या अधिकांश विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रती प्रत-ारणा केल्याचे या यात्रेत दिसून आले.
चार लाख भाविकांची हजेरी
यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून आढावा बैठक घेण्यात येते, या बैठकीत मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था केली जाते. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त यांचा समावेश असतो. मात्र नारळी पौर्णिमेच्या यात्रेत प्रशासकीय यंत्रणेने प्रचंड हलगर्जी-पणा केल्याचे दिसून आले आहे. यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी भाविकांतून केली जात आहे.