Nanded News : किनवटमध्ये शिधा वाटपात कट्ट्यांतील वजनात घट File Photo
नांदेड

Nanded News : किनवटमध्ये शिधा वाटपात कट्ट्यांतील वजनात घट

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे सर्रास होतेय दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Decrease in weight of kattas in ration distribution in Kinwat

किनवट, पुढारी वृत्तसेवा : किनवट तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य योजना राबवली जात असली तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या धान्याच्या वजनात सातत्याने घट होत असल्याचे निरीक्षण समोर आल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक पोत्यात ५० किलो धान्य असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ४५ ते ४७ किलो धान्य मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या योजनेंतर्गत शासनाने गरीब व गरजू नागरिकांसाठी मोफत रेशन देण्याची योजना कोरोनानंतर सुरू ठेवली असून गहू, तांदूळ यासह काही जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. मात्र, गोडाऊनमधून दुकानदारांपर्यंत येणाऱ्या कट्ट्यांमध्ये चार ते पाच किलोपर्यंत धान्य कमी असल्याची बाब लक्षात आली आहे.

काही रेशन दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कट्ट्यांची शिलाई उघडल्यावर ४६ ते ४७किलोपर्यंतच धान्य आढळते. या प्रकारामुळे लाभार्थ्यांना पूर्ण हक्काचे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तालुक्यातील काही भागांमधून अशा तक्रारी वारंवार समोर येत असून, धान्याच्या वितरणात पारदर्शकता आणि अचूकता राखली जावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील गोडाऊनमधून येणाऱ्या पोत्यांमध्ये शिलाई उघडून धान्य काढले जात असल्याची माहिती मिळते. त्यामुळेच धान्याचे वजन कमी असून वितरणात अडथळे येतात. तहसील प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गरिबांच्या हक्काचे रेशन त्यांच्या हाती पोहोचवावे, अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका कार्यकर्ते जनार्दन काळे यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर, गोडाऊन ते वितरण दुकानापर्यंतच्या प्रक्रियेतील वजन तपासणी, मालाच्या नोंदी, वाहतूक व्यवस्थेतील अचूकता याबाबत पुरवठा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जिल्हास्तरावरून येणाऱ्या मालातच घट होते की, गोडाऊनमध्ये प्रक्रियादरम्यान धान्य कमी होते, याचा शोध घेणेही आवश्यक आहे.

तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारींचा संदर्भ घेता, प्रशासनाने प्रभावी यंत्रणा उभी करून वितरण व्यवस्था पारदर्शक ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांचे अन्नधान्य संपूर्ण आणि वेळेवर मिळू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT