Congress' ward-wise review meetings begin
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, काँग्रेसनेही सूक्ष्म नियोजन करत प्रभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन केले असून, आज (दि.पाच) सिडको हडको परिसरात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक पार पडली.
आगामी काळात नांदेड महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आघाडी किंवा युती एकत्र लढवतील की नाही, याबाबत साशंकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा देत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, प्रभागनिहाय आढावा बैठकीचे नियोजन केले.
काँग्रेसजे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमो गरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हडको येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. स्थानिक पदाधिकारी व वरिष्ठांमध्ये नियोजनासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. व संघटनात्मक कार्यक्रमाची आखणी केली.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, श्याम दरक, सुरेश गायकवाड, मसुद खान, आनंद चव्हाण, बालाजी चव्हाण, शमीम अब्दुल्ला, महेश देशमुख तरोडेकर, जे.पी. पाटील, मुंतजिब, शेख अली खान, अजिज कुरेशी, बाबुसाहेब पाटील, सुरेश हटकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा वापरली असली तरी, काँग्रेस मात्र अजूनही आघाडीच्या प्रयत्नात आहे. भविष्यात आघाडी किंवा युती होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्वबळावर निवडणुका लागण्याची शक्यता गृहित धरून काही प्रभागातील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.