

Crop insurance scam in Nanded district
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बीड पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ४४५३ शेतकऱ्यांच्या नावाने बोगस विमा काढल्याचे प्रकरण उघडकीस आले असून ९ सेतू सुविधा केंद्र चालक पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पथके स्थापन करण्यात आली असून लवकरच काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस शेतकऱ्यांच्या नावाने पीकविमा उचलण्यात आला होता. हे प्रकरण थेट विधिमंडळात गेले. नांदेड जिल्ह्यातही अशाच प्रकारे बोगस शेतकऱ्यांच्या नावे पीकविमा उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे निसर्गाची अवकृपा, राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज घेण्यासाठी आकडता हात घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी मोजक्याच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. पण ४४५३ शेतकऱ्यांच्या नावावर सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस विमा भरला होता. त्यातील काही केंद्रचालक हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे त्यात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान पीकविमा योजना ही शासन आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत चालविली जाते.
२०२४ पासून काही सामाईक सुविधा केंद्रचालकांनी शासनाच्या मालकीच्या, संस्थांच्या नावावर असलेल्या, संमती पत्र नसलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरला होता. छाननीत ४४५३ शेतकऱ्यांची नावे समोर आल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील ४० सेतू सुविधा केंद्राच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
१० पेक्षा जास्त बोगस अर्ज दाखल केलेल्या सेतू सुविधा केंद्रांकडून खुलासे मागविण्यात आले होते. त्यानंतर एका पथकाने ते खुलासे अमान्य केल्यानंतर सेतु सुविधा केंद्रचालक पसार झाले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. पीकविमा उचलण्यासाठी सेतू सुविधा केंद्र चालकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाचा तसेच शासकीय जमिनीचाही वापर केल्याचे निष्पन्न झाले आहेत.