नांदेड ः मानवी तस्करी व लैंगिक अत्याचाराच्या घृणास्पद प्रकरणात पंतप्रधानाचे नाव येणे ही देशाला काळिमा फासणारी बाब आहे, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात शनिवारी आयोजित वातर्ताहर बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण व प्रा. यशपाल भिंगे यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार,महेश देशमुख, बालाजी चव्हाण यांच्यासह पदाधिकरी उपस्थित होते.
खा.चव्हाण म्हणाले,अमेरिकेतील एपिस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यत 33 वेळा उल्लेख आढळलेला आहे. अमेरिकेसोबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या व्यापार करारात, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय शेतीमालावर 18 टक्यांचा कर लावण्यात आला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे, असेही त्यांनी नमूद केले.अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के कर लावण्यात आला आहे. हा तमाम भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय आहे.
एपिस्टीन फाईल व सेनाप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भामुळे संसदेत गदारोळ उठला होता. संसदेतील चर्चेत विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाला महत्त्वाचे स्थान आहे. ही संसदीय पद्धत आहे. परंतु या परंपरेला हरताळ फासण्यात आला. देशाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना बगल देऊन पंतप्रधान मोदी यांनी जबाबदारी झटकवून पळ काढला आहे, यामुळे भारतीय संसद, भारतीय संविधान व देशाच्या लोकशाहीची सर्वत्र बदनामी झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी या आंदोलन करण्यात येणार असल्याचे यशपाल भिंगे यांनी सांगिलले.
बापूसाहेब पाटील यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून बापूसाहेब पाटील यांची सिडको ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.